शिवरायांनाही जिंकता आला नाही, 'हा' किल्ला पर्यटकांसाठी बंद; शेवटच्या टप्प्यात पर्यटकांची संख्या वाढली

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक किल्ला पुढील तीन महिने बंद राहणार आहे. येत्या २६ मेपासून हा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मेहबुब जमादार, प्रतिनिधी

Janjira Fort Closed to Tourists : उन्हाळ्याच्या दिवसात लहान मुलांना सुट्टी असते. त्यामुळे या काळात गड-किल्ल्यांवरील भटकंती वाढते. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांमधून शिवरायांचा इतिहास उलगडला जातो. जे प्रत्येक व्यक्तीला जगण्याची प्रेरणा देतात. दरम्यान महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक किल्ला पुढील तीन महिने बंद राहणार आहे. येत्या २६ मेपासून हा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहे. तत्पूर्वी किल्ल्यावरील पर्यटकांची संख्या मोठ्या संख्येने वाढली आहे.

जंजिरा किल्ला कुणी बांधला?

महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण जलदुर्ग म्हणजे जंजिरा किल्ला. जंजिरा किल्ला एका अंडाकृती खडकावर उभा आहे. मुरुड-जंजिराचा इतिहास पंधराव्या शतकापर्यंत मागे जातो. त्या काळात समुद्री लुटारूंपासून बचाव करण्यासाठी स्थानिक कोळी समाजाने एका प्रचंड खडकावर लाकडी किल्ला बांधला होता. त्यानंतर १६१७ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीचे वजीर मलिक अंबर याने हा किल्ला जिंकला आणि त्याचं नूतनीकरण आणि बळकटीकरण केलं. सिद्दी अंबर हा जंजिरा संस्थानचा मूळ पुरुष मानला जातो. त्यानंतर मराठे, मोगल, पोर्तुगीज यांसारख्या सैन्यांनी वारंवार जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला. पण हा जलदुर्ग कधीच पाडता आला नाही. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनाही हा अभेद्य दुर्ग कधीच जिंकता आला नाही. 

Advertisement

नक्की वाचा - Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास महागणार; पर्यटकांमध्ये संताप, स्थानिकही झाले आक्रमक

जंजिरा किल्ला पुढील तीन महिन्यांसाठी बंद...

उन्हाळी पर्यटन हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात पर्यटकांनी मुरूड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी गर्दी केली आहे. शिडाच्या होड्यांमधून जलप्रवास करत पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्याचा आनंद घेत आहेत. किल्ल्यावर पोहोचण्यासाठी पर्यटकांनी राजपुरी जेट्टीवर गर्दी केलीय. यामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. पावसाळ्याच्या हंगामासाठी २६ मे पासून हा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय मेरी टाइम बोर्डाने घेतलाय. त्यामुळे या आठवड्यात इथं येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे.

कारण काय?

पावसाळा सुरू होण्यापूर्वी दरवर्षी मुरुड-जंजिरा हा किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवला जातो. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो, शिवाय सोसाट्याचा वारा वाहतो. हा जलदुर्ग असल्याने पर्यटकांना बोटीने किल्ल्यापर्यंत यावं लागतं. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी मे ते ऑगस्ट या कालावधीत जंजिरा किल्ला बंद ठेवला जातो.