
मुंबईत आज (14 जुलै) पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. मुंबईत आज सर्वत्र ढगाळ वातावरण तयार झालं आहे. शनिवार मध्यरात्रीपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत असून अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. आठवडाभर असा पाऊस राहील असा देखील अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांना पावसाने मागील 2-3 दिवसांपासून अक्षरश: झोडपून काढलं आहे. कोकण-गोव्यामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा- मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला, खेड-दिवाण खवटी दरम्यान दरड कोसळली)
विदर्भात अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या भागात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भात अन्यत्र सर्वत्र ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यांचा येलो अलर्ट आहे. नागपूर सह विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात जवळपास सर्वत्र मेघ गर्जनेसह वादळी वारे आणि पावसाची शक्यता आहे. बुलढाणा, अकोला, वाशिम, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत कित्येक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
(नक्की वाचा - Konkan Rain : कोकणाला मुसळधार पावसाने झोडपलं; अनेक नद्यांना पूर, रस्ते वाहतुकीवर परिणाम)
या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्याला आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, परभणी, हिंगोली अमरावती, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्र यलो अलर्ट म्हणजे हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबईत वार्षिक सरासरीच्य 45 टक्के पाऊस
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असून आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 45 टक्के पाऊस मुंबईत पडला आहे. गेल्यावर्षीची आकडेवारी पाहता गेल्यावर्षी जुलैच्या मध्यापर्यंत 30 टक्के पाऊस पडला होता. धरणक्षेत्रात मात्र पाऊस अद्याप कमी असून पाणीसाठा केवळ 29 टक्के आहे. या वार्षिक सरासरीचा विचार करता आतापर्यंत मुंबईत शहर आणि उपनगरात मिळून 45 टक्के 1100 ते 1200 मिमी पाऊस पडला. मात्र अजूनही मुंबईकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार कायम आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world