जाहिरात

Rain Update : एल निनोनं शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं, जून कोरडा; महाराष्ट्रावर महागाईचं संकट

एल निनोच्या सावटामुळं पाऊस पुरेसा होईल की नाही याची भीती आहे. अशावेळी महागाई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Rain Update : एल निनोनं शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं, जून कोरडा; महाराष्ट्रावर महागाईचं संकट

मोसीन शेख, प्रतिनिधी

Rain Deficit and Inflation : राज्यात अख्खा जून कोरडा गेल्यानंतर आता कुठे पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पेरण्या लांबल्यात. परिणामी शेती पिकं किंवा भाजीपाला बाजारात यायला आता उशीर होणार आहे. त्यातही एल निनोच्या सावटामुळं पाऊस पुरेसा होईल की नाही याची भीती आहे. अशावेळी महागाई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज, सर्वसामान्यांवर खिशावर परिणाम...
 

राज्यात मान्सून बरसायला सुरुवात झालीय खरी, पण देशात आणि राज्यात आतापर्यंत 40 ते 45 टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. आता जूलै महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार हे निश्चित मानलं जातंय. पुरेसा पाऊस झाला नाही तर हिरवा चारा आणि जनावरांसाठी लागणाऱ्या खाद्याची कमतरता भासून दूध उत्पादनाचा खर्च वाढतो. याआधी दूधाच्या किमती 2 ते 3 टक्क्यांनी वाढल्या आहेत. जुलै किंवा ऑगस्टमध्ये त्यात अजून वाढ होण्याचा अंदाज आहे. खरीपात तूर, उडीद, सोयाबीन, मका अशी पिकं पावसावर अवलंबून असतात. पण पेरण्या लांबल्यानं उत्पादन घटून त्याचा परिणाम बाजारातील दरांवर होणार आहे. 

जून कोरडा गेल्यानंतर आता जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने निर्णायक ठरणार आहेत. या काळात समाधानकारक पाऊस झाला तर ठीक नाहीतर उत्पादनात घट होऊन महागाईचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. धक्कादायक बाब म्हणजे यंदाचा जून महिना गेल्या 126 वर्षातील सर्वात कोरडा महिना ठरला आहे. 

नक्की वाचा - 'तो आता खेळायला येईल...', मुंबईत झाड कोसळल्याने कुटुंबाचं जग उद्ध्वस्त, विहानची बॅट छातीला बिलगून आई निस्तब्ध!
 

यंदाचा जून 126 वर्षातील पाचवा सर्वात कोरडा महिना!

जून 2026 हा 1901 नंतर पाचवा सर्वात कमी पावसाचा महिना ठरला आहे. 1 जून ते 30 जून दरम्यान देशात सरासरी 165.3 मिमी पावसाच्या तुलनेत 99.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण पावसाची तूट 40 टक्क्यांवर पोहोचली आहे. यापूर्वी फक्त चार वेळा अशी स्थिती निर्माण झाली होती.  

1905 - 91.9 मिमी
2009 - 86.6 मिमी
2014 - 92.8 मिमी
1926 - 96.7 मिमी 

इतक्या पावसाची नोंद झाली होती, अशी माहिती हवामान खात्यानं दिलीय. 

जूनच्या अखेरपर्यंत देशातील खरीप पिकांचं क्षेत्र 23 टक्क्यांनी घटलंय. गेल्या वर्षी या काळात देशभरात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली होती. यंदा फक्त 182 लाख हेक्टरवर पेरणी होऊ शकली आहे. कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारनं ३०० हून अधिक संवेदनशील जिल्ह्यांसाठी विशेष कृती आराखडा तयार केला आहे. 

बेभरवशाचा पाऊस, केंद्राचा विशेष कृती आराखडा

शेतकऱ्यांना कमी पाण्यावर येणाऱ्या डाळी, भरड धान्य आणि तेलबियांकडे वळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसंच जलसंधारण, तलाव दुरुस्ती आणि पाण्याचा कार्यक्षम वापरावर भर दिला जात आहे. या उपाय योजनांमुळे उत्पादनातील संभाव्य नुकसान कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दरम्यान, जून महिन्यातील निराशाजनक स्थितीनंतर मान्सूननं पुन्हा वेग पकडायला सुरुवात केल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय. त्यामुळे पावसाची तूट भरुन निघण्यास मदत होईल असा अंदाजही वर्तवण्यात आलाय. 

जुलैच्या सुरुवातीला राज्यभरात पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी चांगला पाऊस होतोय. हा पाऊस असाच सुरू राहावा, जूनमधली पावसाची तूट भरुन निघावी, नदी नाले ओसंडून वाहावेत आणि तलाव, धरणं तुडूंब भरुन जावीत अशीच अपेक्षा शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com