Shivsena UBT MNS Alliance Press Conference: महाराष्ट्राच्या राजकारणात प्रबळ राजकीय नेते म्हणून ओळखले जाणारे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र कधी येणार? याची उत्सुकता अखेर संपली आहे. 24 डिसेंबर 2025 रोजी या दोघांनी आपण युती करत असल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले. वरळीतील 'ब्लू सी' (Blue Sea) येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेसह अन्य काही महापालिका निवडणुकांसाठी आपली युती जाहीर केली. यावेळी राज ठाकरे यांनी "राज्यात राजकीय मुलं पळवणारी टोळी आली आहे," असे म्हणत नाव न घेता महायुतीतील घटक पक्षांवर टीका केली.
नक्की वाचा: मुलगा आजारी असताना नगरसेवक फोडले, ही जखम विसरलात? प्रकाश महाजनांचा सवाल
राज यांची भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका
राज ठाकरे यांनी राज्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले की, "लहान मुलं पळवणाऱ्या खूप टोळ्या महाराष्ट्रात फिरतायत, त्यात दोन आणखी टोळ्या अॅड झाल्यात जी राजकीय पक्षातील मुलं पळवतात. जे निवडणुका लढवणार आहे, त्या उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल." उद्धव ठाकरे यांनी या युतीला 'महाराष्ट्र प्रेमींची युती' असे नाव दिले आहे. ते म्हणाले की, "जे महाराष्ट्रप्रेमी आहेत, ते या युतीमध्ये येऊ शकतात." राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, मी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की कुठल्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. तेव्हापासून युतीची सुरूवात झाली होती.
नक्की वाचा: टोकाचा विरोध ते गळाभेट, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती आणि पडद्यामागील राजकारण
उद्धव ठाकरे म्हणतात, चुकाल तर संपाल!
या पत्रकार परिषदेच्या स्टेजवर दोन्ही भावांसोबत केवळ संजय राऊत यांनाच स्थान देण्यात आले होते. तसेच शर्मिला ठाकरे, रश्मी ठाकरे, अमित ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंब या ऐतिहासिक युतीचे साक्षीदार ठरले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी "चुकाल तर संपाल; तुटू नका, फुटू नका," अशी भावनिक साद मराठी माणसाला घातली.