महिला अत्याचाराच्या घटनांवरून मविआवर सडकून टीका, राज ठाकरे मोदींची भेट घेणार

राज ठाकरे यांनी राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागातर्फे जाहीर करण्यात आलेली आकडेवारी मांडत महाविकास आघाडीचे सरकार असतानाही महिलांवरील अत्याचाराच्या घटना होत होत्या असे म्हणत टीका केली.

जाहिरात
Read Time: 3 mins
नागपूर:

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे हे शुक्रवारी रात्री नागपूरला पोहोचले होते. शनिवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बदलापुरात झालेली भयंकर घटना आणि त्यानंतर सुरू झालेल्या राजकारणावरून टीका केली. राज ठाकरे यांनी राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागातर्फे जाहीर करण्यात आलेली आकडेवारी मांडत महाविकास आघाडीचे सरकार असतानाही महिलांवरील अत्याचाराच्या घटना होत होत्या असे म्हणत टीका केली. महाविकास आघाडीतर्फे बदलापुरातील भयंकर घटनेचा निषेध करण्यासाठी बंद पुकारण्यात आला होता. मात्र या बंदला मुंबई हायकोर्टाने प्रतिबंध घातल्यानंतर मविआच्या नेत्यांनी काळ्या पट्ट्या बांधून निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी म्हटले की, "ज्यांनी बंद ज्यांनी पुकारला होता, त्यांच्याही काळात या घटना घडल्या होत्या. आज जी प्रकरणे एकामागोमाग उघडकीस येत आहे त्यामागे काही राजकारण आहे का ? येणाऱ्या निवडणुका आहेत का  ? निवडणुका आल्या की सरकारला बदनाम करा असे सुरू आहे. मविआ सरकारच्या काळात असे होतेच की, त्याचे काय करणार?" 

शरद पवारांनी जाती-जातींमध्ये विष कालवले

राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली. राज ठाकरे यांनी आरोप केला की फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्रात शरद पवारांनी सुरू केले. महाराष्ट्रात जातीचे विषही त्यांनी कालवले असेही ठाकरे यांनी म्हटले. "राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म होईपर्यंत महापुरुषांची विभागणी जातींमध्ये झाली नव्हती. संतांची विभागणी आडनावांनी केली नव्हती.या सगळ्या गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या." असे राज ठाकरे यांनी म्हटले. 

Advertisement

'ती'च गोष्ट पुन्हा का करू?

शिवसेना (उबाठा) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे हे पुन्हा वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मनसे यावेळी त्यांच्याविरोधात उमेदवार देणार का ? असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे यांनी म्हटले की, 'वरळी मतदारसंघात मनसेची 37-38 हजार मते आहेत. तिथे मी एक गोष्ट पूर्वी केली होती, तीच गोष्ट वारंवार कशी होईल?' राज ठाकरे यांनी मराठवाड्या दौऱ्यापासून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. वरळी मतदारसंघातून संदीप देशपांडे यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. राज ठाकरे यांनी गेल्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. ठाकरे तूर्तास तरी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. 

Advertisement

पंतप्रधानांची भेट घेणार, 'त्या' मागण्याची आठवण करून देणार

राज ठाकरे यांनी आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचे सांगितले. महायुतीला 'बिनशर्त' पाठिंबा देताना राज ठाकरे यांनी सहा मागण्या केल्या होत्या. त्या खालीलप्रमाणे होत्या. 

Advertisement
  1. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. तुम्ही पंतप्रधान झाल्यानंतर मराठी भाषेला जो सन्मान मिळाला पाहिजे तो मिळेल, अशी अपेक्षा आहे.
  2. ज्या मराठा साम्राज्याने देशावर राज्य केलं, त्या मराठा साम्राज्याचा इतिहास लहाणपणापासून देशातील शाळांमध्ये शिकवला जावा. त्यामुळे देशातील मुलांना मराठ्यांचा इतिहास कळेल.
  3. छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक होईल तेव्हा होईल. पण शिवछत्रपतींचं खरं वैभव त्यांचे गडकिल्ले आहे. या गड-किल्ल्यांना पूर्वीचं ऐतिहासिक वैभव प्राप्त व्हावं. त्यासाठी एक समिती स्थापन व्हावी. जेणेकरुन येणाऱ्या पिढीला शिवरायांचा इतिहास कळावा, अशी विनंती आहे.
  4. मागील 10 वर्षात देशभरात उत्तम रस्ते बनवले गेले. मात्र मागील 18-19 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्ग प्रलंबित आहे. तो लवकरात लवकर व्हावा.
  5. देशातील मुस्लिमांचं देशावर प्रेम आहे. पण काही मुठभर आहेत, ज्यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. त्यांचा उद्देश योग्य नाही. त्यांना डोकं वर काढण्यासाठी काँग्रेससारखा पर्याय हवाय. ओवेसी सारख्यांचे अड्डे एकदा तपासून घ्या, तिथे देशाचं सैन्य घुसवा.
  6. मुंबईतील रेल्वेला जास्तीत जास्त निधी येणाऱ्या काळात द्या. जेणेकरुन मुंबईकराचा प्रवास सुखकर होईल. 

या मागण्यांची आठवण करून देण्यासाठी आपण पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही भेट झाली तर त्यामध्ये काही राजकीय चर्चा होते का? याबाबत उत्सुकता निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.