मालाड: 'स्वत:च्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसेना नावाचे दुकान काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बाजुला लावले आणि साड्या विकतात, शर्ट विकतात. ज्या राहुल गांधींना आमच्या शिव छत्रपतींची मुर्ती हातात घ्यायला लाज वाटते, त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे जाऊन बसतात,असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. मालाडमध्ये मनसेचे उमेदवार भास्कर परब यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते.
काय म्हणाले राज ठाकरे?
'काल माझी बोरिवलीला सभा होती. तिथून मला वर्सोवा आणि प्रभादेवीची सभा होती. मला काल वर्सोव्याच्या सभेला हजर राहता आलं नाही. त्यासाठी मी पुन्हा संदेश देसाईची दिलगिरी व्यक्त करतो आणि आभारही मानतो.ती भिती नको म्हणून आजच्या सभेला एक तास आधी येऊन थांबलो.या निवडणुकांच्या सभा प्रचंड कंटाळवण्या असतात. तेच तेच विषय असतात. मला सुचेल ते मी आपल्याशी बोलेन,'
'पाच वर्षातला गोंधळ तुम्ही पाहिलेला आहे. कुठपर्यंत गेलं प्रकरण तर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आज गेली एकनाथ शिंदेंकडे, निवडणूक चिन्हासकट. मला अजूनही आठवत, मराठवाड्यामध्ये एक स्लोगन चालायची, की बाण हवा की खान. दुर्दैवाने आज उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला उरलेत फक्त खान.वर्सोव्यामध्ये त्यांनी उमेदवार दिला हरुन खान. ज्याच्या नावातच हरुन आहे तो विजयी कसा होईल? इथपर्यंत तुमची वेळ गेली. कडवट हिंदुत्वापासून मुस्लिमांसमोर लाचार होणाऱ्यापर्यंत. उबाठाचे उमेदवार उर्दुत पत्रक काढतात. काय लेव्हलला आलेत ते बघा .मी टाईम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावरही मराठीमध्येच जाहिरात टाकली होती. सगळ्याच गोष्टी सोडून द्यायचे असेल तर तुमच्याकडे काय उरलं?' असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
नक्की वाचा: भाजपाचे माजी मंत्री मराठा मतांवर 'हे' काय म्हणाले.... नवा वाद पेटणार?
सुरक्षेसाठी ताज हॉटेल झाका....
'एकदा मी बाळासाहेबांचं पुस्तक केलं होतं. त्याचा कार्यक्रम गेट वे ऑफ इंडियाच्या समोर ठेवला होता. त्यावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आले होते. कार्यक्रमाला अटलबिहारी वाजपेयी अमिताभ बच्चन, लतादिदी, शरद पवार, बाबासाहेब पुरंदरे होते. त्या कार्यक्रमाचे आम्ही नियोजन करत होतो.त्यावेळी वाजपेयी यांच्या सेक्युरिटी पाहणाऱ्यांनी मला बोलावून घेतलं. मला म्हणाले हे काय आहे?मी म्हणलं, ताजमहाल हॉटेल आहे. म्हणाले हे त्याला झाकावं लागेल. अरे ते काय माझ्या बापाचे हॉटेल आहे का? मी प्रमोद महाजनांना फोन केला, त्यांना सांगितलं हे हॉटेल झाकायला लावतात. म्हणजे हे सिक्युरिटी वाले काहीही विचार करतात,' असा किस्साही त्यांनी यावेळी सांगितला.
दरम्यान, 'आज नवीन गोष्ट प्रसिद्ध झाली. मोठ्या प्रमाणावर बांग्लादेशी मुसलमान आणि रोहिंगे मुंबईमध्ये शिरतात. त्याचा रिपोर्ट असा आहे की हे प्रमाण इतके वाढेल की मुंबईत हिंदुंचे प्रमाण ५० टक्केच्या खाली येईल. माझा मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांवर १०० टक्के विश्वास आहे. ते ४८ तासात महाराष्ट्र साफ करतील.पण राज्यकर्त्यांना असल्या गंभीर विषयांकडे बघायला वेळ नाही. आम्ही गुंतलोय आमच्या खुर्च्यांमध्ये,' असे म्हणत त्यांनी राज्यकर्त्यांनाही टोला लगावला.