Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava: मराठी भाषा ते युती; राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे

Uddhav Thackeray Raj Thackeray Meet: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित आल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins

Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion: मराठी भाषेच्या विजयी मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल 20 वर्षांनी एकत्र आले. मुंबईतील वरळी डोममध्ये आयोजित केलेल्या या मेळाव्यात मराठी जणांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. कोणत्याही पक्षाच्या झेंड्याखाली न येता, केवळ मराठी भाषेसाठी (Marathi Language Controversy) ठाकरे बंधू एकत्र आल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी राज ठाकरे यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला. दोघांनीही मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला. यानिमित्ताने ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

राज ठाकरे यांच्या  भाषणातील महत्त्वाचे मुद्दे...

  1. सन्माननीय उद्धव ठाकरे आणि मराठी बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो अशी राज ठाकरेंनी भाषणाची सुरूवात केली. खरंतर दोघांची भाषणं संपली की एकत्र आरोळ्या ठोका. खरंतर आज मोर्चा निघायला हवा होता. मराठी माणूस सर्वबाजूने कसा एकवटतो याचं चित्र मोठ्या प्रमाणावर उभे राहीले असते. पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. हा मिळावा शिवतीर्थावर व्हायला हवा होता. 
  2. मी मुलाखतीत म्हटले होते की कोणत्याही वादापेक्षा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. 20 वर्षानंतर उद्धव आणि मी एका व्यासपीठावर येतोय. जे माननीय बाळासाहेबांना, अनेकांना जमलं नाही, आम्हाला एकत्र आणायचे ते देवेंद्र फडणवीसांना जमले.
  3. कोणताही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा. महाराष्ट्राकडे कोणीही वेड्यावाकड्या नजरेने पाहायचे नाही. हे सगळं अचानक कुठून आले हे कळालेच नाही. कशासाठी हिंदी ? कोणासाठी हिंदी ? लहान मुलांवर हिंदीची जबरदस्ती करताय? कोणाला काही विचारायचे नाही, आमची सत्ता आहे, बहुमत आहे आम्ही लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर.  
  4. दादा भुसेंना सांगितलं की तुम्ही काय सांगताय ते ऐकू, मात्र तुमचे ऐकणार नाही. त्रिभाषा सूत्र हे केंद्र आणि राज्यातील समन्वयासाठी आणले होते. केंद्रीय शिक्षण धोरणातही हिंदी सक्तीचा विषय नाही. महाराष्ट्रात त्यांनी प्रयोग करून पाहीले. दक्षिणेतील राज्य यांना हिंग लावून विचारत नाही. महाराष्ट्र जेव्हा पेटून उठतो तेव्हा काय घडतं हे राज्यकर्त्यांना समजलं असेल, त्याशिवाय का माघार घेतली ?
  5. हिंदी भाषिक राज्ये ही आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. यांना राज्यांचा विकास करता आला नाही. हिंदी न बोलणाऱ्या राज्यांत, हिंदी बोलणाऱ्या राज्यातून लोकं येत आहेत आणि हे म्हणतायत हिंदी शिका. 5 वीनंतर हिंदी चित्रपटसृष्टीत जाणार आहे का मुलगा ? हिंद प्रांतावर सवाशे वर्ष मराठ्यांनी राज्य केलं. इतक्या प्रदेशांवर आम्ही राज्य केलं, आम्ही मराठी लादली ? मराठा साम्राज्य अटकेपर्यंत पोहोचले होते, आम्ही मराठी लादली ? हिंदी भाषा ही तर 200  वर्षांपूर्वीची भाषा आहे. हिंदी छत्रपती शिवाजी महाराजांच्याही काळात नव्हती. 
  6. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करता येते का यासाठी भाषेला डिवचून बघू, महाराष्ट्र शांत राहीला तर पुढे ते पाऊल टाकू. कोणाची माय व्यायलीय त्यानी मुंबई, महाराष्ट्राला हात घालून दाखवावा. माघार घेतली ना मग त्याचं काय करायचं मग सगळं प्रकरण वेगळ्या ठिकाणी वळवा, म्हणजे कुठे? ठाकरेंची मुलं इंग्रजीमध्ये शिकली, याकडे.  दादा भुसे मराठीतून शिकून शिक्षणमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस इंग्रजीतून शिकून मुख्यमंत्री झाले, कुठे काय शिकले याचा काय संबंध ?
  7. कोणाकोणाची मुलं परदेशात शिकतायत याच्या याद्या आहेत. मंत्रिमंडळातील मंत्र्यांचं हिंदी ऐका, फेफरं येईल.  आम्ही मराठी माध्यमातून शिकलो, हो शिकलो. आमची मुलं इंग्रजीतून शिकली, हो शिकली. सन्माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी माध्यमातून शिकले आहेत, या दोघांवर तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का ?  जयललिता, स्टॅलिन, कनिमोळी, उदयनिधी, चंद्राबाबू नायडू, पवन कल्याण, नारा लोकेश, कमल हासन, विक्रम, सूर्या, ए.आर.रहमान हे दक्षिणेतले इंग्रजीतून शिकलेले नेते आणि अभिनेते आहेत. रहमान हे व्यासपीठावरील महिला हिंदीतून बोलल्यामुळे स्टेजवरून खाली उतरले. 
  8. विविध राज्यांच्या रेजिमेंट आहे. शत्रू दिसला की एकत्र तुटून पडतात ना ? भाषेचा प्रश्न येतो कुठे ? आताच सांगून ठेवतो, आज महाराष्ट्रातील 'मराठी' म्हणून एकत्र आला, त्यांचं पुढचं राजकारण म्हणजे तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील, पुन्हा हे जातीचे कार्ड खेळणार. अजून तर काहीच केलंलं नाही, विनाकारण उठसूठ मारामारी करायची गरज नाही. मात्र जास्त नाटकं केली तर कानाखाली  आवाज काढलाच पाहीजे पुन्हा. पण चूक त्यांची असली पाहीजे. मात्र यापुढे अशी कोणतीही गोष्ट कराल त्याचे व्हिडीओ काढू नका. मारणारा कधी सांगत नसतो, मार खाणारा सांगत असतो, मला मारलं म्हणून. 
  9. 1999 साली शिवसेना-भाजपचे सरकार येणार की नाही अशी परिस्थिती होती.  शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. त्यावेळी शिवसेना-भाजपच्या वादामध्ये काहीच होत नव्हतं. एकेदिवशी मी मातोश्रीवर बसलो होतो, दोन गाड्या लागल्या. साडेतीन चारच्या सुमारास. प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आली आणि म्हणाली की बाळासाहेबांना भेटायचे आहे. अर्जंट आहे असं म्हणाले. ते म्हणाले मुख्यमंत्रीपदाचा विषय निकाली लागला आहे. सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचे असे दोन्ही बाजूने ठरल्याचा ते निरोप घेऊन आले होते. बाळासाहेबांना सांगितलं तेव्हा त्यांनी मला म्हटले की त्यांना जाऊन सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल, दुसरा कोणी होणार नाही. 
  10. सगळ्या युत्या आघाड्या होत राहील, महाराष्ट्र मराठी माणूस यावर तडजोड होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही. पुढे काय गोष्टी घडतील याची कल्पना नाही, मात्र मराठीसाठीची एकजूट कायम राहावी आणि महाराष्ट्रात बाळासाहेबांचे स्वप्न पुन्हा साकारावे अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो.