जाहिरात

Ratnagiri Bird Sanctuary: कोकणातील निसर्ग वाचवण्यासाठी मोठं पाऊल! रत्नागिरीत 'पक्षी अभयारण्य' उभारण्याची मागणी

रत्नागिरी जिल्ह्यातील बेसुमार जंगलतोड, निसर्गाचा ऱ्हास आणि 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेले वाढते तापमान रोखण्यासाठी 'हेल्प फाऊंडेशन, चिपळूण' या संस्थेने वनखात्याचे जमीन क्षेत्र वाढवून 'पक्षी अभयारण्य' (Bird Sanctuary) विकसित करण्याची मागणी केली आहे.

Ratnagiri Bird Sanctuary: कोकणातील निसर्ग वाचवण्यासाठी मोठं पाऊल! रत्नागिरीत 'पक्षी अभयारण्य' उभारण्याची मागणी

राकेश गुडेकर, रत्नागिरी

Ratnagiri Bird Sanctuary: रत्नागिरी जिल्ह्यातील वाढते तापमान, बेसुमार जंगलतोड आणि निसर्गाचा ऱ्हास रोखण्यासाठी आता जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्याला एक नवी ओळख आणि निसर्ग संवर्धनासाठी जिल्ह्यातील वनखात्याचे जमीन क्षेत्र वाढवून 'पक्षी अभयारण्य' (Bird Sanctuary) विकसित करण्यात यावे, अशी महत्त्वपूर्ण मागणी 'हेल्प फाऊंडेशन, चिपळूण'ने शासनाकडे केली आहे. यासंदर्भात वनमंत्री आणि वनसचिवांना विशेष निवेदनही सादर करण्यात आलं आहे. अशी माहिती हेल्प फाउंडेशनचे सतीश कदम यांनी दिली आहे..

वाढत्या तापमानावर 'पक्षी अभयारण्या'चा उपाय

सध्या रत्नागिरीचे तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, त्यात सातत्याने वाढ होत आहे. काही वर्षांपूर्वी हेच तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित होते. वाढती जंगलतोड आणि नैसर्गिक रचनेत होत असलेले बदल यामुळे डोंगराळ भागातील जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी वनखात्याच्या जमिनीचे क्षेत्र वाढवून तिथे 'पक्षी अभयारण्य' उभारणे हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे संस्थांचे म्हणणे आहे. 

अभयारण्य उभारणीचे फायदे

  • जैवविविधतेचे जतन: अभयारण्य उभारल्यास परिसरातील जैविक साखळी मजबूत होईल.
  • पाणवटे आणि संवर्धन: वन्यजीवांसाठी पाणवटे निर्माण करणे, तसेच दुर्मिळ औषधी वनस्पती आणि झाडांचे संवर्धन करणे यामुळे शक्य होईल.
  • खाजगी जमिनींचा उपयोग: जिल्ह्यातील 98 टक्के वनक्षेत्र हे खाजगी मालकीचे आहे, तर वनखात्याकडे केवळ दोन टक्के क्षेत्र आहे. त्यामुळे संवर्धनाच्या कामात मर्यादा येतात. डोंगराळ भागातील पडीक जमिनी वनखात्याकडे हस्तांतरित केल्यास, त्यांचे 'आरक्षित क्षेत्र' म्हणून विकास करणे सोपे होईल.

रत्नागिरीची पक्षिधनासाठी ओळख

रत्नागिरी जिल्ह्यात 250 हून अधिक विविध प्रकारच्या पक्षी प्रजाती आढळतात. तिबोटी खंड्या, निळ्या कानाचा खंड्या, महाधनेश आणि बेडूकतोंड्या यांसारख्या दुर्मिळ पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी देश-विदेशातील अनेक अभ्यासक रत्नागिरीला भेट देतात. चिपळूणमधील वालोपे वनक्षेत्र, गणेशखिंड परिसर, दसपटी विभाग, तसेच संगमेश्वरमधील शास्त्री नदी परिसर आणि मारळेश्वर भागात पक्ष्यांचे मोठे वास्तव्य आहे. मात्र, जंगलतोडीमुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

प्रशासनाकडून अपेक्षा

जिल्ह्यातील 60 टक्के खाजगी वनजमीन अनेक वर्षांपासून पडीक असून तिचा कोणताही उपयोग होत नाही. अशा जमिनी अधिग्रहित करून तिथे पक्षी अभयारण्याची निर्मिती केल्यास पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आणि पर्यटनालाही मोठी चालना मिळेल, असा विश्वास सामाजिक संस्थांनी व्यक्त केला आहे.

आता वन विभाग या मागणीचा गांभीर्याने विचार करून कोकणातील निसर्ग वाचवण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काय पावले उचलतो, याकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com