Nanded News : गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यातील पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पेट्रोल-डिझेल पंप बंद होईल या भीतीने नागरिक पेट्रोल पंपांवर मोठी रांग करीत असल्याचं वृत्त अनेक जिल्ह्यांमधून समोर आलं आहे. परिणामी पेट्रोल पंपांवर अतिरिक्त ताण येत असल्याने पंप बंद करण्याची वेळ काही भागात ओढवली आहे. दरम्यान कोणत्याही प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहे.
नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे आदेश...
नांदडेचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितलं की, पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नसतानाही अफवांमुळे पेट्रोल पंपावर मोठा फटका बसत आहे. एका दिवसाच्या आवकेच्या तुटनेत तिप्पट मागणी केली जात असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक पेट्रोल-डिझेल खरेदी करू नये. त्यामुळे रेशनिंगचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात सर्व पेट्रोल पंपावर आदेश देण्यात आले आहेत. आपल्याकडे पुरेशी आवक आहे, मात्र अतिरिक्त मागणी निर्माण झाल्यामुळे तणाव निर्माण होत आहे.
पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी रेशनिंगचा निर्णय घेण्यात आला असून यापुढे गेअर नसलेल्या दुचाकींना 200, बाईकला (गेअर असलेल्या) 300 रुपये तर चार चाकी वाहनांना पेट्रोल पंपांवर 1500 रुपयांचं पेट्रोल घेता येणार असल्याचे आदेश नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.