India's first Melody Road Closed : जगातील पाचवा आणि भारतातील पहिलाच प्रयोग मुंबईतील कोस्टल रोडवर राबविण्यात आला होता. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी याचं उद्घाटनही करण्यात आलं होतं. मात्र अवघ्या दीड महिन्यात हा प्रयोग बंद करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेने यासंदर्भात निर्णय घेतला आहे.
दीड महिन्यात संगीत रस्ता बंद...
मुंबईच्या कोस्टल रोडवर विशेष संगीत पट्ट्या बसवण्यात आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी ११ फेब्रुवारी रोजी याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. हा जगातील पाचवा आणि भारतातील पहिलाच प्रयोग असल्याचं सांगण्यात आलं होतं. मुंबईच्या कोस्टल रोडवरील येणाऱ्या-जाणाऱ्या वाहन चालकांना जय हो या गाण्याचा आवाज ऐकू येत होता. मात्र भारतातील हा पहिलाच प्रयोग तेथील रहिवाशांसाठी मात्र त्रासदायक ठरत असल्याचं दिसून येत आहे.
ब्रीच कँडी परिसरातील ६५० कुटुंबीयांनी सांगितलं, सकाळी ६ वाजल्यापासून रात्री उशीरपर्यंत या रस्त्यावर गाणी सुरू असतात. या रस्त्यावरुन सतत गाड्याची वर्दळ असते. त्यामुळे सतत गाणं वाजत असतं. या आवाजाचा आम्हाला त्रास होतो. या परिसरात शाळा आणि रुग्णालयं असून रात्रीच्या वेळी आवाज स्पष्ट ऐकू येतो. त्यामुळे घराच्या खिडक्याही उघड्या ठेवता येत नसल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे.
फक्त विकेंड किंवा विशेष दिवशी मार्ग खुला...
दरम्यान रहिवाशांच्या तक्रारीनंतर ‘मेलोडी रोड'वर बॅरिकेड्स बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. BMC कडून ‘मेलोडी रोड' तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोस्टल रोडवरील हा उपक्रम सुरू झाल्यानंतर अवघ्या दीड महिन्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. ध्वनी पातळी नियमांमध्ये असल्याचे BMCचे म्हणणे असले तरीही विरोध लक्षात घेऊन कारवाई करण्यात आली आहे. या पुढे फक्त विशेष दिवस किंवा विकेंडला मार्ग खुला ठेवण्याचा विचार असल्याचं सांगितलं जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world