अखेर आरटीई प्रवेश प्रक्रियेचा मुहूर्त लागला असून आरटीई प्रवेश प्रक्रियेला आजपासून नव्याने सुरुवात होणार आहे. पालकांना आज 17 मे ते 31 मेपर्यंत आरटीईसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज भरलेल्या पालकांनाही नव्याने आपल्या पाल्यांचा अर्ज भरावा लागणार आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत एक लाखांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. आता आरटीई 24 टक्के राखीव जागांसाठी नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे. ज्या पालकांनी यापूर्वी त्यांच्या पाल्यांची आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केली आहे, त्यांनाही पुन्हा नोंदणी करावी लागणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी यांनी सांगितलं.
काय केला होता बदल?
आरटीई प्रवेशाच्या पोर्टलवर आरटीई प्रवेशास पात्र असणाऱ्या शाळा व प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या जागांची जिल्हानिहाय माहिती देण्यात आली आहे. आरटीई प्रवेशासाठी राज्य शासनाने 9 फेब्रुवारी 2024 रोजी नवीन आदेश काढला होता. त्यानुसार विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर परिसरातील अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा असल्यास त्याच शाळेत प्रवेश दिला जाणार होता. म्हणजेच खासगी शाळेत प्रवेश देण्यात येणार नाही, असं सांगण्यात आलं होतं.
नक्की वाचा - बापाचं 'बाप' काम! लेकीच्या लग्नातील आहेर केलं दान, कारण काय?
या बदलास पालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर शासनाच्या बदललेल्या निर्णयावर न्यायालयाने स्थगिती दिली होती. शासनाच्या नवीन नियमांमुळे सर्वसामान्य मुलांनी इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळेची वाट बिकट झाली होती. श्रीमंत मुलांसाठी इंग्रजी माध्यमांची खासगी शाळा तर गरीब मुलांसाठी शासकीय शाळा अशी वर्गवारी यामुळे झाली असती. मात्र उच्च न्यायालयाने शासनाचा हा निर्णय रद्द केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world