सुनिल दवंगे, प्रतिनिधी
Shirdi News : भोंदू अशोक खरात याच्या काळ्या साम्राज्याचे धागेदोरे आता राजकीय वर्तुळातील नातेसंबंधांपर्यंत पोहोचले आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर आज शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाल्या आहेत. समता पतसंस्थेतील संशयास्पद कोट्यवधींच्या व्यवहाराप्रकरणी पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती.
१०० पैकी ४ खाती चाकणकर कुटुंबाची....
अशोक खरात विरोधात शिर्डीत बेकायदेशीर सावकारी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तपासादरम्यान पोलिसांना 'समता पतसंस्थेत' खरातशी संबंधित अशी 100 संशयास्पद खाती आढळली आहेत. ज्यामध्ये खरात हा 'नॉमिनी' (वारसदार) आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यातील 4 खाती प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या नावे असल्याची माहिती समोर आली होती. चाकणकर यांची खाती आमच्या पतसंस्थेत आहे, हे माहीत नव्हत. मात्र पोलिसांनी याबाबत विचारणा केल्यानंतर ते आमच्या लक्षात आलं. मात्र आम्ही सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करुनच खाती उघडली असल्याचा खुलासा समता पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष काका कोयटे यांनी केला आहे.
सख्ख्या बहिणींची चौकशी...
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, प्रतिभा चाकणकर यांच्या नावे 2 खाती आहेत. त्यांच्या मुलांच्या नावे 2 खाती आहेत. या चारही खात्यांवरून एकूण 2 कोटी 40 लाख रुपयांचे मोठे व्यवहार झाले आहेत. या पैशांचा स्रोत काय आहे? हे पैसे खरातच्या सावकारी व्यवसायाशी संबंधित आहेत का? आणि या व्यवहारांमागे खरातचा नेमका हेतू काय होता? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी शिर्डी पोलिसांनी चाकणकर यांचा जबाब नोंदवण्यास शिर्डी पोलिसात नोंदवला जातो. आज मंत्रिमंडळाची कॅबिनेट मंडळाची बैठक होणार असून याबाबत मुख्यमंत्री अधिक माहिती देवू शकतात. मात्र जस जसा तपास पुढे जाईल तसे यातून आणखी नावे पुढे येतील असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलय.
अशोक खरातशी असलेल्या संबंधांच्या आरोपावरून रुपाली चाकणकर यांनी आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता त्यांच्या सख्ख्या बहिणीचीच पोलीस चौकशी सुरू झाल्याने या प्रकरणाला मोठे राजकीय वळण मिळालेय. तर अलिकडे रुपाली चाकणकर यांचे नाव बाजूला सारून त्यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांना पुढे केलं जात असून हा प्रकार रुपाली चाकणकर यांना वाचवण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव ॲडव्होकेट रंजना गवांदे यांनी केला आहे.
३३ खातेदाकांचे जबाब नोंदवले...
शिर्डी पोलिसांनी 9 एप्रिल रोजी प्रतिभा चाकणकर यांना चौकशीची नोटीस काढत 10 एप्रिल रोजी भारतीय डाक विभागाच्या रजिस्टर टपालानं त्यांच्या दोन पत्त्यांवर पाठवली होती. त्यानंतर त्या आता चौकशीसाठी हजर झाल्या आहेत. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणाशी संबंधित 33 खातेदारांचे जबाब नोंदवले आहेत. मात्र, चाकणकर कुटुंबाशी संबंधित असलेल्या या खात्यांमधील मोठी रक्कम पाहता प्रतिभा चाकणकर यांचा जबाब या संपूर्ण तपासातील सर्वात महत्त्वाचा दुवा मानला जात आहे. प्रतिभा चाकणकर काय जबाब नोंदवणार? अशोक खरातविषयी काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world