शरद सातपुते, सांगली:
Sangli Crime: पतीच्या छाताडावर बसून गळा आवळत प्रियकराच्या मदतीने त्याचा खून करणाऱ्या विवाहितेचा धक्कादायक कट विश्रामबाग पोलिसांनी उघडकीस आणला. घराबाहेर मारहाण झाल्याने पतीचा झोपेत मृत्यू झाल्याचा बनाव रचत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या कसून चौकशीत पत्नीच्या जबाबातील विसंगती समोर आली आणि संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला. ही घटना सांगलीतील पोळ मळा परिसरात घडली.
Dharashiv Politics: उद्धव ठाकरेंचा झंझावाती दौरा! बंडखोर ओमराजेंच्या बालेकिल्ल्यात तोफ धडाडणार
लव्ह मॅरेजचा भयंकर शेवट...
समोर आलेल्या माहितीनुसार, सांगलीच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करणारे आनंद हणमंत सर्जे (वय 28) हे पत्नी व 2 मुलांसह राहत होते. गुरुवारी पहाटे पत्नी आणि मेहुण्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेहावरील गळ्यावरील ओरखडे पाहून विश्रामबाग पोलिसांना संशय आला. त्यानंतर मिरज येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव आणि त्यांच्या पथकाने पत्नीची सखोल चौकशी केली. तिच्या जबाबातील विसंगती लक्षात आल्यानंतर तपासाची दिशा बदलण्यात आली. प्राथमिक तपासात पती दारूच्या नशेत मारहाण व शिवीगाळ करत असल्याच्या रागातून पत्नीने आपल्या 23 वर्षीय प्रियकरासोबत खुनाचा कट रचल्याचे समोर आले.
छाताडावर बसून पतीला संपवलं
गुरुवारी पहाटे झालेल्या किरकोळ वादानंतर पत्नीने प्रियकराला घरी बोलावले. दोघांनी मिळून आनंद सर्जे यांचे पाय ओढणीने बांधले आणि त्यांच्या छाताडावर बसून गळा दाबत त्यांचा खून केला. त्यानंतर संशय टाळण्यासाठी पत्नीने भावाला बोलावून घेत पतीला रुग्णालयात नेले. "बाहेर कुणीतरी मारहाण केल्याने ते घरी येऊन झोपले होते," अशी खोटी माहिती देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दरम्यान, आनंद सर्जे यांचा प्रेमविवाह झाला होता आणि त्यांना दोन लहान मुले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world