
शरद सातपुते
नवनवीन प्रयोग करणे अनेकांचा छंद असतो. त्यासाठी ते मेहनतही घेतात. त्या मेहनतीला अनेक वेळा चांगले फळही मिळते. यातूनच काही शोध ही लागतात. सांगलीत दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आपल्या कल्पक बुद्धीने असाच एक शोध लावला आहे. त्याने एक असे तंत्र विकसित केले आहे, ज्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना लगाम बसणार आहे. त्यामुळे दारुच्या नशेत गाडी चालवून होणारे अपघात टाळता येणार आहेत. असा दावा या विद्यार्थ्याने केला आहे. "ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम" त्याने विकसीत केली आहे.
प्रेम पसारे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो दहावीच्या वर्गात सध्या शिक्षण घेत आहे. सांगलीच्या या रँचोने "ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम" विकसीत केली आहे. नशेत वाहन चालविल्यामुळे झालेला अपघात त्याने एकदा पाहिला होता. तेव्हा त्याला ‘आयडिया' सुचली. दीड वर्षाच्या प्रयत्नानंतर त्याने ‘ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम' बनवली आहे. या सिस्टिम नुसार मोटारचालकाने नशेत इंजिन सुरू केले तर तत्काळ मालकाला मोबाइलवर ‘व्हॉईस कॉल' जाईल.‘आपके कार का चालक नशे मे है' असे त्याला ऐकवून जाईल. शिवाय तो ज्या ठिकाणी आहे त्याचे ‘लोकेशन' देखील पाठवले जाईल.
तसेच इकडे मोटारीचे इंजिनदेखील बंद पडेल,अशी सिस्टीम दहावीत शिकणाऱ्या प्रेम नवनाथ पसारे या विद्यार्थ्याने बनवली आहे. प्रेमाचे वडील हे शहरात चहा विक्रीचा व्यवसाय करतात. प्रेम पसारे याला वेगवेगळ्या प्रयोगाबद्दल लहानपणापासूनच कुतूहल होते. वेगवेगळ्या कल्पना प्रेमच्या डोक्यात भिरभिरत असायच्या. एकदा कुटुंबासमवेत फिरायला जाताना त्याने नशेत वाहन चालविल्यामुळे गाडी झाडावर आदळून झालेला अपघात पाहिला. तेव्हा असा अपघात रोखण्यासाठी काय करावे? असे विचारचक्र त्याच्या डोक्यात सुरू झाले. चालक जर नशेत असेल तर मोटार सुरूच होणार नाही, अशी सिस्टीम तयार करण्याविषयी प्रयत्न तो करू लागला.
नक्की वाचा - Mumbai News: 'अब्बा' म्हटल्याचा राग आल्याने खून केला, दुसरे लग्न करणाऱ्या इम्रानला अटक
यातुन दीड वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर प्रेम याने ‘ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम' बनवली. त्याच्या ही सिस्टीम सेन्सर आधारित आहे. कार चालकाने नशेत असताना गाडी सुरू केली तर तत्काळ मालकाच्या मोबाइलवर एक व्हॉईस कॉल,गाडीचा क्रमांक,इंजिन,चेस नंबर आणि लोकेशन आदी माहिती गाडीच्या मालकाला जाते. शिवाय गाडीचे इंजिन बंद होते,अशी सिस्टीम बनवल्याचा दावा प्रेमने केला आहे. प्रेम याने बनवलेली यंत्रणा मोटारीत बसवण्यासाठी साधारणपणे पंधरा हजारांपर्यंत खर्च येतो.तसेच यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी मोबाइलवर ॲप आवश्यक असते. परंतु त्यामुळे अपघात टळून लाखमोलाचा जीव वाचू शकतो,या सिस्टीमच्या पेटंटसाठी प्रेमच्या वडिलांनी प्रस्ताव पाठवला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world