
शरद सातपुते, देवा राखुंडे, प्रतिनिधी
शेतकरी नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी त्यांना राज्यपाल करण्याची मागणी केली आहे. सांगली जिल्ह्यातील विटामध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडाळकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी खोत बोलत होते. खोत हे पडळकर यांचे निकटवर्तीय नेते आहेत. भाजपाच्या पाठिंब्यानं विधानपरिषदेवर आमदार असलेल्या सदाभाऊ यांनी यावेळी आपली अवस्था बँडवाल्यासारखी होईल, असं वक्तव्य केलं. त्यामुळे त्यांचं हे वक्तव्य मिश्किल टिप्पणी आहे की खदखद अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कुणी कितीही देव पाण्यात घालू दे देवाभाऊ गोपीचंद पडाळकर यांना नक्की मंत्री करणार, असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे खासदार होतील असं भाकित त्यांनी यावेळी केलं.
( नक्की वाचा : Farmer Loan : शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहिरनाम्यातच? राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्पष्टीकरण... )
यावेळी बोलताना सदाभाऊ यांनी सांगितलं की, बाबा तुम्ही आमदार व्हा. डॉक्टर तुम्ही खासदार व्हा.पडळकरसाहेब तुम्ही मंत्री व्हा, मला कुठंतरी राज्यपाल तरी करा. नाहीतर आमची अवस्था बँडवाल्यासारखी होईल. चांगलं गाणं वाजू लागलं की आजूबाजूचे म्हणतात वन्स मोअर, तो देखील जोमानं वाजवतो. ही आमची अवस्था आहे. सदाभाऊ यांनी हे वक्तव्य करताच व्यासपीठावर आणि सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.
सदाभाऊ खोत यांचं स्पष्टीकरण
दरम्यान, सदाभाऊ खोत महायुतीमध्ये नाराज आहेत का? अशी चर्चा सुरु झाल्यानंतर त्यांनी याविषयावर स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या वक्तव्यावर बोलताना सदाभाऊ म्हणाले की,
मी राज्यात गेले अनेक वर्ष शेतकरीच चळवळीत काम करतो आहे. आमची लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित आहे. माझ्या मनात कधीही खदखद नसते. माझी भाषा शैली गावगड्याची रानडी आहे.
गाव गाड्यातला थकलेला शेतमजूर बारा बलुतेदार माझ्या सभेला असतो त्यांनी सभेला आल्यानंतर मनमोकळेपणाने हसलं पाहिजे यासाठी मी बोलत असतो.
ज्याला दृष्टी नसते त्याच्यासमोर हत्ती आल्यानंतर त्याचा हात जिथे जिथे लागेल त्या पद्धतीने तो हत्तीचं वर्णन करतो. तसं माझ्या वक्तव्याचं वर्णन दृष्टी नसलेली माणसं जेवढे जेवढे त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचेल त्या त्या पद्धतीने ते वर्णन करत असतात, असं स्पष्टीकरण खोत यांनी दिलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world