शरद सातपुते, सांगली
Sangli News : डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश निश्चित मानला जात आहे. सांगलीच्या भाळवणीमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये चंद्रहार पाटलांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी चंद्रहार पाटलांकडून मंत्री सामंत यांना चांदीची गदा देखील भेट देण्यात आली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चंद्रहार पाटील हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार होते. तर गेल्या काही दिवसांपासून चंद्रहार पाटील हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा सुरू आहेत. या सर्वच पार्श्वभूमीवर पैलवान चंद्रहार पाटील यांच्या भाळवणी गावात मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेला हा कार्यक्रम चंद्रहार पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश असल्याचे मानले जात आहे.
(नक्की वाचा- Dhananjay Munde : मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे सध्या काय करतात? नवी माहिती समोर)
"आमच्या गळ्यात हार घालताय, पण एकनाथ शिंदे यांच्या हातून गळ्यात कधी हार घालायचा, हे लवकर ठरवा", अशा शब्दात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना थेट शिवसेना शिंदे गटात येण्याची जाहीर ऑफर दिली आहे. "चंद्रहार पाटलांची ताकद मोठी आहे, पण ते जिथे आहेत तिथे त्यांच्या ताकदीचा उपयोग झाला नाही आणि कधी होणारही नाही", असा टोला देखील मंत्री सामंत यांनी लगावला.
( नक्की वाचा : केमिस्ट्रीच्या शिक्षिकेवर नवऱ्याच्या हत्येचा आरोप, कोर्टात असा केला युक्तिवाद की न्यायाधीशही थक्क! पाहा Video )
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात जाणार,अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. या सर्व पार्श्वभूमीवर चंद्राहार पाटील यांच्या भाळवणी गावामध्ये मंत्री उदय सामंत त्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमामुळे चंद्रहार पाटील हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात जाणार, अशा चर्चांना पुन्हा उधान आले आहे.