महायुतीमधील धुसफूस आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. नवी मुंबईतील भाजप नेते गणेश नाईक यांच्या एका विधानावरून शिवसेना नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला असून भाजपला थेट इशारा दिला आहे. "आमचा संयम सुटला तर ते महायुतीसाठी चांगलं ठरणार नाही," असं विधान शिरसाट यांनी केलं आहे.
नक्की वाचा: Ganesh Naik: '...तर यांचा नामोनिशान संपवून टाकू', गणेश नाईक यांचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा
डोकं ठिकाणावर ठेवून बोला, नाईकांना इशारा
नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता, 'नामोनिशाण मिटवून टाकू असं विधान केलं होतं.' गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात राजकीय वितुष्ट असून महापालिका निवडणुकांमध्ये हे वितुष्ट आणखीनच वाढल्याचे पाहायला मिळाले होते. गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा टीका केली असून ही टीका शिवसेनेतील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आवडलेली नाहीये. शिरसाट यांनी गणेश नाईकांबद्दल बोलताना म्हटले की, "गणेश नाईकांचं जरा जास्तीच होत चाललंय. दरवेळी आव्हानाची भाषा करणाऱ्यांनी डोकं ठिकाणावर ठेवून बोलावं. एकनाथ शिंदे यांच्यामुळे तुम्ही सत्तेत आलात, हे विसरू नका."
शिंदेंना हलक्यात घेऊ नका, शिरसाटांनी बजावले
शिरसाट यांनी म्हटले की, "साफ करण्याची कोणाला भाषा करताय, नवी मुंबईचे डोंगर आहेत का? रेतीची खाण आहे साफ करायला? आम्ही ऐकतो याचा अर्थ असा होत नाही की आम्हाला काही कळत नाही. महायुतीचा धर्म आम्ही पाळायचा आणि तुम्ही बोलायचं हे आता सहन होणार नाही. साफ करून टाकू, उखडून टाकू ही भाषा कोणासाठी करताय? आम्ही जो त्याग केलाय, त्यामुळे ही सत्ता आज दिसतेय. एकनाथ शिंदे यांना हलक्यात घेऊ नका."
नक्की वाचा: KDMC Mayor Election: कल्याण-डोंबिवली महापौरपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला, पहिले संधी कोणाला ?
भाजपला शिवसेनेचा इशारा
शिरसाट यांनी म्हटले की, महायुतीत बिघाड होऊ नये यासाठी आम्ही बोलत नाही. बिघाड व्हावा असं वाटत असेल तर आव्हान द्या आम्ही स्वीकारायला तयार आहोत. शिरसाट यांनी पुढे म्हटले की, "आम्ही उठाव केला नसता तर तुमचा पक्ष सत्तेत आला नसता हे लक्षात ठेवा. आमचं बलिदान आहे, सत्ता मिळवण्यासाठी घेतलेले कष्ट महाराष्ट्राची जनता जाणते. नवी मुंबईत भाजपचीच एक वाघीण आहे, तिच्याशी निपटा पहिले."