Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यानंतर मोठ्या घडामोडी घडत आहेत. दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशातच आता विजय वडेट्टीवार यांनी वाल्मिक कराडबाबत केलेल्या एका दाव्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड याचा पोलीस इन्काऊंटर होऊ शकतो असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा इन्काऊंटर होऊ शकतो. त्यामुळे माझी पोलिसांना विनंती आहे की त्याचा इन्काऊंटर करु नका, त्यामुळे पुरावे नष्ट होतील, असं विजय वडेट्टीवार म्हणालेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कराडच्या इन्काऊंटरबाबत एका पोलीस अधिकाऱ्यानेच माहिती दिल्याचेही विजय वडेट्टीवार म्हणालेत. त्यांच्या या दाव्याने आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच वाल्मिक कराडची निष्पक्ष चौकशी करायची असेल तर हा खटला बीडच्या बाहेर चालवा. बीडमध्ये नेहमीच त्यांच्या मर्जीतील पोलीस असतात, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, बीड पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराडचे लाड पुरवले जात असल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला. महायुती सरकारच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मीक कराड येत असल्याने बीड पोलीस स्थानकात नवीन पाच पलंग आले का? वाल्मीक कराड पोलीस कोठडी मध्ये असताना पाच पलांगांची आवश्यकता भासावी, इतके योगायोग चित्रपटात ही नसतात, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
नक्की वाचा - Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही फरार, शोध सुरू
दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी स्थापन केलेली एसआयटी आता बीडमध्ये दाखल होणार आहे. आयपीएस बसवराज तेली यांच्या नेतृत्वात १० जणांची टीम या प्रकरणाचां सखोल तपास करणार आहे. एसआयटीच्या स्थापनेनंतर या प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. आज बसवराज तेली आणि त्यांची टीम बीडमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world