राहुल तपासे, प्रतिनिधी
Satara News : आता ही बातमी ऐकून हसू आलं तरी चालंल. पण काम एकदम भारी झालंय. साताऱ्यातील मान्याचीवाडी गावानं थेट गाय-म्हशींसाठी ब्युटी पार्लर काढलं. आता गावात याची चर्चा सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातला पाटण तालुक्यातील मान्याची वाडी गाव. देशभरातून 82 बक्षिसं मिळवलेली ही पंचायत. आदर्श गाव म्हणून गावाचं नाव आधीच झालंय. आता मात्र या गावात गाई-म्हशींसाठीच एक नवं काम काढलय. गाव लहानसं…पण डोस्कं लय भारी चालवलं. या गावाने गाई-म्हशींसाठी थेट ब्युटी पार्लर उभं केलं आहे.
जनावरांसाठी ब्युटी पार्लरची गरज काय?
आधी गावकरी काय करायचे तर गाई-म्हशींना नदीत न्यायचे. येथे त्यांना आंघोळ घातली जायची. परंतू यामुळे शेण, चिखल नदीत जायचा. पुढे तेच पाणी प्यायला आणि वापरायला. त्यामुळे पंचायतीने महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी जनावरांना आंघोळीसाठी वेळचं ठिकाण तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यातून जनावरांचं ब्युटी पार्लर उभं राहिलं.
आता गावातील म्हैस शॉवरखाली आंघोळ करते. येथे तिच्या अंगावरील केस काढले जातात, अंग घासून स्वच्छ केलं जातं. विशेष म्हणजे हे आंघोळीचं वाया पाण्यावर प्रक्रिया केली जाते. आणि हेच पाणी झाडांना आणि परसबागेसाठी वापरलं जातं. त्यामुळे एकाच वेळी जनावरांचं आरोग्य आणि पर्यावरण संरक्षण या दोन्ही गोष्टी साध्य होत आहेत. मान्याची वाडीचा हा प्रयोग सध्या राज्यभरात कौतुकाचा विषय ठरत असून इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे पाटण तालुका पुन्हा एकदा आपल्या नाविन्यपूर्ण कामामुळे चर्चेत आला आहे. मान्याची वाडीचा हा फंडा जर सगळ्या गावांनी वापरला तर नदी-नाले आपोआप स्वच्छ होतील, त्यामुळे पंचायतीने इतर गावांना जनावरांसाठी विशेष ब्युटी पार्लर उभारण्याचं आवाहन केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world