- राहुल तपासे, प्रतिनिधी
Satara News: साताऱ्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या ओझर्डे धबधबा परिसरात सध्या भीतीचे वातावरण पसरलं आहे. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांनाही सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातोय. सध्या परिसरात रानगव्यांनी धुमाकूळ घातला आहे. रानगव्याने केलेल्या हल्ल्यात एक शासकीय कर्मचारी गंभीररित्या जखमी झाला आहे. या हल्ल्यात पाटण तालुक्यातील नवजा येथील तलाठी अजय जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन रानगव्यांनी मिळून केलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ओझर्डे धबधबा परिसरात नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, अजय जाधव हे तलाठी म्हणून कार्यरत असून बुधवारी (4 मार्च 2026) आपले शासकीय कामकाज उरकून रात्री 8 वाजण्याच्या सुमारास आपल्या बाइकवरून घरी परतत होते. ओझर्डे धबधबा परिसरातील निर्जन रस्त्यावर ते आले असताना अचानक एक महाकाय रानगवा त्यांच्या बाइकसमोर आडवा आला. गव्याला पाहताच जाधव यांनी लगेचच आपली बाइक थांबवली. जाधव समोरच्या गव्याकडे लक्ष देत असतानाच, रस्त्याच्या कडेला असलेल्या दाट झुडपातून दुसरा रानगवा बाहेर आला आणि त्याने मागील बाजूने जाधव यांच्यावर जोरदार हल्ला केला.
(नक्की वाचा: Navi Mumbai News: नवी मुंबई विमानतळाची सुरक्षा धोक्यात? पेट्रोल-गॅस सिलिंडरचा काळा धंदा, उलवे परिसरात मृत्यूचा सापळा)
पायाला गंभीर दुखापत
या अनपेक्षित हल्ल्यामुळे जाधव यांचा तोल गेला आणि ते बाइकसह खाली कोसळले. रानगव्याने दिलेल्या या धडकेत त्यांच्या पायाला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली आहे. रात्रीची वेळ असल्याने परिसरात मदतीसाठी कुणीही नव्हते, अशाही स्थितीत त्यांनी प्रसंगावधान राखून स्वतःचा जीव वाचवला.
(नक्की वाचा: Nagpur News: रंगाचा थेंब पडला अन् आजीने 4 वर्षाच्या नातवावर उकळतं पाणी ओतलं, CCTV पाहून होईल संताप; पाहा VIDEO)
वनविभागाकडे ठोस कारवाईची मागणीओझर्डे धबधबा परिसरात गेल्या काही दिवसांपासून रानगव्यांचा वावर वाढला आहे. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ, पर्यटक आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने या हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world