जाहिरात

'ब्रम्हाला' खलास करणाऱ्या 'छोटा मटका'ला पुन्हा जंगला सोडा! काय आहे वाद? ज्यामुळे वन्यजीवप्रेमी करतायत मागणी

Chota Matka: मे महिन्यामध्ये छोटा मटका याची आणि बलाढ्य अशा ब्रम्हा वाघाची अत्यंत भीषण झुंज झाली होती.

'ब्रम्हाला' खलास करणाऱ्या 'छोटा मटका'ला पुन्हा जंगला सोडा! काय आहे वाद? ज्यामुळे वन्यजीवप्रेमी करतायत मागणी
मुंबई:

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील अत्यंत प्रसिद्ध अशा छोटा मटका या वाघाला वन्य विभागाने पकडलं असून, त्याला गोरेवाडा प्राणी संग्रहालयात नेण्यात आले आहे. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या कृतीमुळे वन्यजीवप्रेमी चिंतेत पडले आहेत. छोटा मटका जर गोरेवाड्यात गेला तर त्याचा तिथेच मृत्यू होईल अशी भीती वन्यजीवप्रेमींना सतावते आहे. यामुळे त्यांनी मिळेल त्या माध्यमातून या मुद्दावर आवाज उठवण्यास सुरूवात केली आहे. 

प्रकरण नेमके काय आहे ? 

मे महिन्यामध्ये छोटा मटका याची आणि बलाढ्य अशा ब्रम्हा वाघाची अत्यंत भीषण झुंज झाली होती. वर्चस्वासाठीच्या या लढाईत छोटा मटकाने ब्रम्हाला ठार मारले होते. छोटा मटका हा ताडोबातील अत्यंत प्रसिद्ध वाघ आहे. याच झुंजीदरम्यान छोटा मटका जखमी झाला होता. त्याच्या पायाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे  त्याला शिकार करणे कठीण जाईल असा दावा केला जाऊ लागला. जखमी झाल्यानंतरही गुरांची शिकार करणे छोटा मटकाने सोडले नव्हते. या छोटा मटकाला जखमी झाल्यामुळे उपचारासाठी नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात नेण्याचा वन विभागाने निर्णय घेतला आहे आणि यालाच वन्यजीव प्रेमी विरोध करत आहेत. 

छोटा मटका नरभक्षी नाही!

वन्यजीवप्रेमी तौसीफ यांनी म्हटले की, "जखमी झाल्यानंतर छोटा मटकाने गुरांना मारायला सुरुवात केली असे नाहीये, तो आधीपासून गुरांना मारत होता. तो नरभक्षी तर अजिबातच नाहीये." तौसीफ यांनी असेही म्हटले की वन विभागाने दावा केला होता की झुंजीनंतर शिकारीसाठी महत्त्वाचे असलेले छोटा मटकाचे 4 पैकी 3 दात निकामी झाले आहेत. मात्र हे धादांत खोटे असून त्याचे दात चांगले असल्याचे तौसीफ यांनी म्हटले आहे.

Chota Matka After Fight With Bramha: झुंजीनंतरही छोटा मटकाचे दात शाबूत असल्याचे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे (Photo- Tauseef Ahmed)

Chota Matka After Fight With Bramha: झुंजीनंतरही छोटा मटकाचे दात शाबूत असल्याचे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे 
Photo Credit: Tauseef Ahmed

अभिनेत्री आणि वन्यजीव फोटोग्राफर सदा हिने म्हटले की, "झुंजीनंतर छोटा मटकाची प्रकृती काहीशी खालावली होती, 17 जूनला त्याच्यावर उपचार करण्यात आले होते आणि त्याची प्रकृती सुधारायला लागली होती. यानंतर त्याने शिकारही करण्यास सुरूवात केली होती. मात्र दरम्यान त्याला पुन्हा त्रास होऊ लागला होता. या संदर्भातील बातम्यांची दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतली होती." वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे की झुंजीनंतर छोटा मटका जखमी झाला होता आणि त्याचवेळी त्याच्यावर उपचार केले असते तर ही वेळ आली नसती. वन्यजीवप्रेमी आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफर असलेल्या रेश्मा भोगले यांनी म्हटलंय की, छोटा मटका ताडोबातून गेल्याने जंगल रिकामं झाल्यासारखं, निर्जीव झाल्यासारखं वाटतंय. 

अधिकाऱ्यांचे काय म्हणणे आहे ?

गोरेवाडा येथील ॲनिमल रेस्क्यू सेंटर प्रमुखाचा पदभार DFO सध्या नंदकिशोर राऊत सांभाळत आहेत. त्यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना म्हटले की, स्थानिक वन अधिकाऱ्यांना अपेक्षा होती छोटा मटका लवकर बरा होईल. त्यांनी दीड दोन महिने प्रतिक्षा केली, पण तो बरा होईल अशी चिन्हे दिसत नव्हती. त्याला तसेच जंगलात राहू देणे देखील योग्य नव्हते, कारण एकतर  तो जगला नसता किंवा अन्य एखाद्या वाघाने हल्ला केला असता तर तो त्याच्यासमोर टिकू शकला नसता. राऊत यांनी पुढे म्हटले की, छोटा मटकाला जगवणे आणि लवकरात लवकर बरा करणे हा आमचा उद्देश आहे. ज्या दिवशी पशुवैद्यकीय तज्ज्ञ प्रमाणित करतील त्यादिवशी त्याला जंगलात परत सोडणे, हे आमचे लक्ष्य आहे. मात्र, तो बरा होईपर्यंत त्याला उपचारासाठी कॅप्टिव्हिटी मध्ये ठेवणे भाग आहे. 

छोटा मटकाबद्दल वन्यजीवप्रेमींची मागणी काय आहे

वन्यजीवप्रेमी संतोष यांनी म्हटले की, छोटा मटकाच्या पायाला गँगरीन झालंय अशी अफवा पसरवण्यात आली होती. त्याला पकडण्यासाठी वातावरणनिर्मिती व्हावी अशा उद्देशाने ठराविक अँगलने फोटो व्हिडीओ प्रसारीक करण्यात आले. सेव्ह छोटा मटका या कँपेनही विशिष्ट हेतूने प्रेरीत असावे असा संशय आहे. छोटा मटका याला गोरेवाडा प्राणी संग्रहालयात नेण्यात आले असून, तिथे गेलेला वाघ परत कधीही जिवंत बाहेर येत नाही असे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे. या वाघावर उपचार करावेत आणि त्याला पुन्हा जंगला सोडावे अशी मागणी करण्यात येत आहे. जर या वाघाचा मृत्यू व्हायचा असेल तर तो नैसर्गिक अधिवासातच व्हावा असे या वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे. छोटा मटकाला पकडल्याने आणि स्थलांतरीत केल्याने आता त्याच्या हद्दीत दुसरा वाघ घुसेल आणि त्याच्या 8 छाव्यांना बछड्यांना ठार मारू शकेल अशी भीतीही वन्यीवप्रेमी व्यक्त करत आहेत. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com