जाहिरात

आधार आणि पीएफ खाते लिंक नसल्याचे कारण देत कर्मचाऱ्याला कामावरून काढलं, अवघ्या 2 दिवसांत मिळाला न्याय

8 वर्षे कंपनीसाठी इमानेइतबारे सेवा बजावणाऱ्या दुर्गवले यांना आपला नेमका दोष काय आहे? हे कळायला काहीच मार्ग दिसत नव्हता.

आधार आणि पीएफ खाते लिंक नसल्याचे कारण देत कर्मचाऱ्याला कामावरून काढलं, अवघ्या 2 दिवसांत मिळाला न्याय

मुंबईतील कांदिवली येथे असलेल्या मुंबई क्रिकेट असोशिएशन स्पोर्ट्स अकादमीला सेवा पुरवणाऱ्या एका कंपनीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला 2 जुलै रोजी कामावरून काढून टाकत असल्याची नोटीस बजावण्यात आली. 56 वर्षांच्या एकनाथ दुर्गवले यांना ही नोटीस मिळाल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. बोरिवलीचे रहिवासी असलेल्या दुर्गवले यांच्या घरची परिस्थिती बेताची आहे.

(नक्की वाचा: ऑन ड्युटी महिला पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न, पुण्यातील खळबळजनक घटना)

दोष काय होता?

त्यांचे कुटुंब हे त्यांच्या कमाईवर अवलंबून असल्याने दुर्गवले यांच्या डोळ्यासमोर ही नोटीस पाहिल्यानंतर अंधार दाटला. दुर्गवले यांची सेवा थांबवण्यामागचे कारण काय आहे? हे त्यांना सांगण्यात आले नव्हते. 8 वर्षे कंपनीसाठी इमानेइतबारे सेवा बजावणाऱ्या दुर्गवले यांना आपला नेमका दोष काय आहे हे कळायला काहीच मार्ग दिसत नव्हता. 

दुर्गवले यांना योग्य कारण सांगितले नाहीच शिवाय त्यांच्याकडून जबरदस्तीने राजानीमा घेतला गेला. या कर्मचाऱ्याने भारतीय कामगार सेनेकडे दाद मागितली होती. भारतीय कामगार सेनेने सदर प्रकरणी कंपनीकडे पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना सांगण्यात आले की दुर्गवले यांच्या पीएफ खात्यात काहीतरी अडचण आहे.

(नक्की वाचा: BMCच्या गैरसमजुतीतून आणि चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल, रवींद्र वायकरांना क्लीन चीट)

या चुकीमुळे झाली अडचण निर्माण

अधिकची विचारणा केली असता कंपनीतर्फे सांगण्यात आले की, दुर्गवले यांचे आधार कार्ड आणि पीएफ खाते यांची जोडणी करण्यात अडचण येत आहे. ही अडचण येत असल्याने दुर्गवले यांना कामावरून कमी करण्यात आले. भारतीय कामगार सेनेचे चिटणीस मनोज धुमाळ यांनी सदर कंपनीशी पत्रव्यवहार केला आणि दुर्गवले यांना तत्काळ कामावर परत घेण्यास सांगितले. कामावर परत न घेतल्यास तुमच्याविरोधात कायदेशीर लढा देऊ असा इशारा देण्यात आला. यामुळे कंपनीने आपला निर्णय फिरवत अवघ्या दोन दिवसात दुर्गवले यांना पुन्हा कामावर घेत असल्याचे जाहीर केले. 2 जुलै रोजी दुर्गवले यांना निलंबित करण्यात आले होते आणि 4 जुलैला त्यांचे निलंबन मागे घेत असल्याचे पत्र जारी करण्यात आले. सदर प्रकाराबाबत बोलताना धुमाळ यांनी सांगितले की, "दुर्गवले यांना पीएफचा प्रॉब्लेम आहे म्हणून कामावरून काढलं होतं. आधार कार्ड आणि पीएफ लिंक होत नसल्याचे कारण सांगण्यात आले. कोणतेही योग्य कारण न देता दुर्गवले यांना निलंबित करण्यात आले. अशा पद्धतीने योग्य कारण न देता, अन्याय करत कोणालाही कामावरून काढणे हे चुकीचे आहे."

(नक्की वाचा: Maharashtra Rain Alert : राज्यात आज कुठे-कुठे पावसाची शक्यता? काय आहे हवामान विभागाचा अंदाज?)

बस झालं राजकारण...डबलडेकर बस गुजरातहून का मागवली? NDTV मराठी स्पेशल रिपोर्ट | NDTV मराठी

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com