Shahapur News : दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे शहापूर-मुरबाड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. काळू नदीला पूर आल्याने चिखले आणि अंबर्जे गावाजवळील महत्त्वाचा पूल पाण्याखाली गेला आहे.
शहापूर आणि मुरबाडला जोडणारा हा पूल सध्या पूर्णपणे पाण्याखाली आहे. परिणामी मुरबाड-वाशिंद मार्गावरील रहदारी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने नदीची पाणी पातळी अजूनही वाढत आहे. नदीच्या दोन्ही तिरावर नागरीक पाणी ओसरण्याची वाट पहात आहेत.
या पुलावरून ये-जा करणाऱ्या जवळपास 10 ते 15 गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. शाळा, दवाखाना आणि बाजारपेठेसाठी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने नागरिकांना या रस्त्याचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे. पाणी ओसरल्यानंतरच पूल सुरू होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. तोपर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि नदीकाठच्या भागात जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world