ऋतिक गणकवार, मुंबई:
Shaina NC Cyber Fraud News: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या, राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांच्या नावाचा गैरवापर करून सायबर भामट्यांनी त्यांच्या संपर्कातील अनेक व्यक्तींची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॅकर्सनी शाइना एनसी यांचा फोटो (डीपी) आणि मोबाईल क्रमांक वापरून त्यांच्या परिचितांना आर्थिक मदतीचे संदेश पाठवले, ज्यामुळे अनेकजण या जाळ्यात अडकले.
शायना एनसींच्या नावाने मोठी फसवणूक..
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार १६ जुलै रोजी दुपारी १.३० ते ३.३० या वेळेत घडला. हॅकर्सनी अत्यंत शिताफीने शायना एनसी यांच्या ओळखीतील लोकांना "Hi, Needed some help please, can I send 49,000 to a number?" असा संदेश पाठवला. विश्वास संपादन केल्यानंतर, पीडितांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर प्रत्येकी ४९ हजार रुपये पाठवण्यास सांगण्यात आले.
या फसवणुकीत अनर्वी भगत, मृणाल तलवरे, निकिता जाधव, वृषा भंसाळी, विवेक सज्जन आणि दरयश धामे या सहा जणांनी एकूण २ लाख ९५ हजार रुपये ट्रान्सफर केले. आपल्या नावाचा गैरवापर झाल्याचे लक्षात येताच शायना एनसी यांचे स्वीय सहाय्यक निलेश धोंडे यांनी तत्काळ गावदेवी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी निलेश धोंडे यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३५६(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(सी) व ६६(डी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सध्या गावदेवी पोलीस सायबर सेलच्या मदतीने आरोपींचा शोध घेत आहेत. या धक्कादायक प्रकाराने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world