सागर कुलकर्णी, पुणे: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला पराभवाचा सामना करावा लागला. निवडणुकीआधी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अवघ्या 10 जागा जिंकता आल्या. त्यामुळे शरद पवार यांच्यासमोर पुन्हा एकदा नव्याने पक्ष बांधणीचे आणि आमदार टिकवण्याचे आव्हान आहे. अशातच त्यांनी राष्ट्रवादीमध्ये मोठ्या बदलाचे संकेत देत दोन महत्वाच्या नियुक्त्या केल्या आहेत. मात्र या नियुक्त्यांमुळे ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बाजूला सारत आहेत का? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या गटनेतेपदी जिंतेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली असून दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे
चिरंजीव आणि सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांच्याकडे पक्षाच्या मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासोबतच सहप्रतोदपदी उत्तम जानकर यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादीमध्ये जयंत पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू शिलेदार असताना त्यांना बाजूला सारत जितेंद्र आव्हाड यांच्यासह नवख्या रोहित पाटील यांच्याकडे मोठ्या जबाबदारी दिल्याने शरद पवार यांनी नवी मोट बांधण्याचे संकेत
दिले असल्याची चर्चा आहे. काय आहे शरद पवारांची ही खेळी अन् आगामी रणनिती? वाचा महत्वाचे मुद्दे....
नक्की वाचा: सस्पेन्स संपला! CM पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव फायनल; पीटीआयची माहिती
1. निष्ठेच्या लढाईत आव्हांडावर विश्वास...
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये सर्वाधिक अनुभवी आणि ज्येष्ठ म्हणून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. मात्र शरद पवार यांनी जयंत पाटील यांना विधिमंडळ घटनेचा पदावर नियुक्ती न करता शरद पवार यांनी विधिमंडळ गट नेते पदावर नियुक्ती करताना जितेंद्र आव्हाड यांच्यावर अधिक विश्वास दाखवला आहे. यामागे प्रमुख कारण म्हणजे जयंत पाटील यांच्याविषयी रंगलेल्या चर्चा.
अजित पवार यांच्या बंडापासून जयंत पाटीलही त्यांच्यासोबत जाणार अशा बातम्या समोर आल्या होत्या. जयंत पाटील यांनी अमित शहांची भेट घेतल्याचीही चर्चा होती. तसेच जयंत पाटील यांच्यासाठी महायुतीमध्ये एक मंत्रिपद ठेवलं आहे, असं अजित पवार म्हणाले होते. आता पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
याउलट जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावान शिलेदार म्हणून ओळखले जातात. या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोठ्या फरकाने विजय संपादन केला आहे. महत्वाचं म्हणजे जयंत पाटील हे सर्वाधिक लीड घेतील अशी अपेक्षा होती मात्र त्यांचा फक्त 11,00 मतांच्या फरकाने विजय झाला. त्यामुळेच जितेंद्र आव्हाड यांना शरद पवारांनी ताकद दिली असल्याची शक्यता आहे.
2. रोहित पाटील यांना ताकद
शरद पवार यांनी आणखी एक महत्वाची नियुक्ती करताना सर्वात तरुण आमदार आणि राजकारणात नवखे असलेल्या रोहित पाटील यांच्याकडे पक्षाच्या मुख्य प्रतोदपदाची धुरा दिली आहे. यामागेही शरद पवार यांची महत्वाची खेळी आहे. रोहित पाटील यांना ताकद देऊन शरद पवारांनी जयंत पाटील यांना संकेत दिल्याचे बोलले जात आहे. आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे रोहित पाटील हे रोहित पवार यांच्या जवळचे आहेत. रोहित पाटील यांच्या अर्ज भरण्यापासून, प्रचारातही रोहित पवार यांनी महत्वाची भूमिका निभावली होती.
त्यामुळे भविष्यामध्ये रोहित पवार यांच्यावर महत्वाची जबाबदारी देताना त्यांच्या बाजूने उभी राहणाऱ्या नेत्यांची फळी तयार करण्याचीही पवारांची रणनिती असावी अशी शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे विधानसभेआधी राष्ट्रवादीमध्ये जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार यांच्यामध्ये अंतर्गत संघर्ष रंगला होता. रोहित पाटील यांच्याकडे जबाबदारी देण्यावरुनच हा वाद झाल्याची चर्चा होती. अशात आता शरद पवारांनीच रोहित पाटील यांना ताकद दिल्याने जयंत पाटील यांच्याविरुद्ध खेळी आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
3. तरुणांसह नवी पक्षबांधणी
शरद पवार हे वारंवार पक्षामध्ये तरुण आणि नवी पिढी तयार करण्याबाबत बोलत असतात. यामुळेच त्यांनी रोहित पाटील यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली आहे. तसेच उत्तम जानकर यांनाही त्यांनी ताकद देऊन नवी मोट बांधण्याची तयारी केली असल्याचे संकेत दिले आहेत. थोडक्यात येत्या पाच वर्षात पक्षासमोर असलेली आव्हाने अन् पक्ष बांधणीच्या दृष्टीने शरद पवारांनी हे बदल केल्याचे दिसत आहे.