अविनाश पवार, जुन्नर: 'पक्ष फोडायला अक्कल लागत नाही. एखादी गोष्ट उभी करायला अक्कल लागते, जिथे अक्कल नाही अशांना त्यांची जागा दाखवावी लागेल. राजकारणात चुकीचे काम जुन्या आमदारांकडून होत असेल तर तो निकाल तुम्हाला घ्यावा लागेल, त्याच्या हातातली सत्ता काढून घ्यावी लागेल.. ' असे म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार गटाचे उमेदवार अतुल बेनके यांच्यावर सडकून टिका केली. जुन्नर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार सत्यशिल शेरकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी, अमित शहांसह महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला.
काय म्हणाले शरद पवार?
'निवडणुकीच्या निमित्ताने आज मी पुन्हा इथे आलो. काही महिन्यांपूर्वीच लोकसभा दौरा झाला. राज्याचे लोकसभेचे सभासद डॉ. अमोल कोल्हे हे माझ्यासोबत होते. त्यानंतर पुन्हा मी विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने बोलण्यासाठी आलो आहे. गेल्या काही दिवसांपासून मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरण्याचा प्रयत्न करतोय. नाशिकवरुन आज या ठिकाणी आलोय, महाराष्ट्राच्या अनेक तालुक्यात मी भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतोय. देशाची लोकसभा निवडणूक झाली. यामध्ये तुम्ही चांगले काम केले, एक जबरदस्त शक्ती आम्हाला दिली,' असं शरद पवार म्हणाले.
नक्की वाचा: 'तुतारी'चा नाद महागात पडला', अपक्ष उमेदवारावर गुन्हा दाखल, साताऱ्यात काय घडलं?
शिंदे, पवारांवर निशाणा
'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते अनेक वर्ष शिवसेनेचे अनेक वर्ष मंत्री होते. त्यांनी 30, 40 आमदार एकत्र केले आणि गुवाहाटीला गेले, राज्याची सत्ता हातात घेतली. त्यानंतर अजित पवारांनी 40 आमदार घेतले आणि उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले.कोणत्याही मार्गाने सत्ता हातात ठेवण्याचे काम यांनी केले. आज त्यांच्या लक्षात आलं लोकसभेला धक्का बसला .म्हणून त्यांनी कार्यक्रम हाती घेतले. पहिला कार्यक्रम माझी लाडकी बहीण. लाडक्या बहिणींना 1500 रुपयांची गरज आहे की तिच्या रक्षणाची.माझ्या मते तिच्या रक्षणाची गरज आहे. असा टोला यावेळी शरद पवार यांनी लगावला. महाराष्ट्रामध्ये गेल्या आठ महिन्यात 1600 मुलींचे अपहरण झाले, कोणी केले माहित नाही. ठाणे जिल्ह्यात दोन मुलींवर अत्याचार झाले. त्यामुळे मुलींच्या हातात 1500 रुपये ठेवायचे की तिच्या रक्षणाचे काम करायचे?' असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
शेतकरी आत्महत्येचा मन सुन्न करणारा प्रसंग
'मला आठवतंय माझ्याकडे शेती खाते असताना यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मला समजलं,तातडीने प्रधानमंत्र्यांना घेऊन त्या शेतकऱ्याच्या घरी गेलो. ज्या घरात आत्महत्या झाली, त्यांचा कर्ता पुरुष गेला.त्याच्या पत्नीला,लहान मुले, लग्नाला आलेली मुलीला विचारलं तुझ्या पतीने आत्महत्या का केली? ती बिचारी उत्तर देऊ शकत नव्हती, रडत होती. माझा नवरा शेतीत कष्ट करणारा होता.कपाशीचं पीक होतं, कापसासाठी बी घेतलं, औषध आणली, फवारणीची व्यवस्था घेतली.
त्यासाठी सोसायटीचे कर्ज घेतले. सोन्यासारखं पीक आलं पण अतिवृष्टीने सगळं उध्वस्त झालं. पुढच्या वर्षी पुन्हा खासगी सावकाराकडून कर्ज घेतलं. पुन्हा चार पाच एकर कापूस लावला, त्यावर्षी लाल्या नावाचा रोग पडला पीक गेलं. पीक गेलं पण कर्ज गेलं नाही. एक दिवस सावकार दारात आला त्याने घरातली भांडीकुंडी बाहेर काढली, अब्रुचा पंचनामा झाला. मुलीचं लग्न ठरलेलं मोडलं. हे माझ्या पतीला सहन झालं नाही, म्हणून त्याने जीव दिला, ' असा काळीज पिळवटून टाकणारा प्रसंगही त्यांनी यावेळी सांगितला.
महत्वाची बातमी: 'अमित शाह बच्चा' काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असं का म्हणाले?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world