Sharad Pawar Health Updates: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) सर्वेसर्वा शरद पवार यांच्या छातीमध्ये संसर्गाची समस्या निर्माण झाल्यानंतर त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि त्यांना दोन दिवसांत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती डॉक्टरांनी बुधवारी (11 फेब्रुवारी) दिली. श्वसनाशी संबंधित समस्या आणि सतत खोकला येण्याच्या समस्येमुळे 85 वर्षीय शरद पवारांच्या प्रकृतीत बिघाड झाला होता. यानंतर सोमवारी (9 फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास त्यांना बारामती येथील त्यांच्या निवासस्थानावरून रूबी हॉल क्लिनिकमध्ये आणण्यात आले.
शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती
यानंतर बुधवारी हॉस्पिटलचे डॉक्टर आणि विश्वस्त डॉ. सायमन ग्रँट यांनी निवेदनाद्वारे सांगितले की, पवार यांची प्रकृती स्थिर असून त्यात सुधारणा होत आहे. त्यांची एकूण स्थिती स्थिर आणि समाधानकारक आहे. त्यांच्यावरील उपचारांचे चांगले परिणाम दिसून येत आहेत, प्रकृतीत सुधारणाही दिसतेय. अलीकडील व्यापक दौरे आणि लोकांशी सतत झालेल्या भेटीगाठींमुळे शारीरिक ताण आणि थकवा हे प्रकृती बिघडण्यामागील कारण असल्याचेही डॉक्टरांनी नमूद केले. डॉ. ग्रँट म्हणाले, "शरद पवार यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत असल्याने पुढील दोन दिवसांत त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्याचा विचार करत आहे."
(नक्की वाचा: Supriya Sule Daughter Marriage: पवार कुटुंबात सनईचौघडे! सुप्रिया सुळेंची लेक अडकणार विवाहबंधनात, हा होणार जावई)
अजित पवार यांचे अपघाती निधन
शरद पवार यांचे पुतणे अजित पवार (Ajit Pawar Death News) यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. या कौटुंबिक दुखवट्यामध्ये सांत्वनासाठी येणाऱ्या लोकांच्या भेटीगाठी करताना 85 वर्षीय शरद पवार यांची धावपळ झाल्याचे म्हटलं जातंय. वयोमानानुसार त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची माहिती समोर आली होती.
रोहित पवार यांचे आवाहनआदरणीय पवार साहेबांची तब्येत व्यवस्थित असून त्यांना ॲडमिट करण्यात आलं नाही तर ते डॉक्टरांच्या निगराणीखाली एका रुममध्ये आहेत. गेल्या काही दिवसांत अधिक धावपळ झाल्याने काहीसा थकवा आणि कफ झाला आहे. सध्या त्यांच्यावर कोणतेही उपचार सुरु नाहीत तर काही टेस्ट केल्या आहेत, त्याचे रिपोर्ट…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 9, 2026
शरद पवार यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झालं होतं. कार्यकर्त्यांची हॉस्पिटल परिसरात गर्दी होऊ शकते, हे लक्षात घेता रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर पोस्ट करत आवाहन केलं की, "आदरणीय पवार साहेबांची तब्येत व्यवस्थित असून त्यांना ॲडमिट करण्यात आलं नाही तर ते डॉक्टरांच्या निगराणीखाली एका रुममध्ये आहेत. गेल्या काही दिवसांत अधिक धावपळ झाल्याने काहीसा थकवा आणि कफ झाला आहे. सध्या त्यांच्यावर कोणतेही उपचार सुरु नाहीत तर काही टेस्ट केल्या आहेत, त्याचे रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टर पुढील निर्णय घेतील. सध्या तरी काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. बातम्या बघून साहेबांवरील प्रेमापोटी अनेकांची हॉस्पिटलमध्ये भेटीसाठी येण्याची इच्छा आहे, परंतु सध्या तरी कुणीही हॉस्पिटलमध्ये येऊन गर्दी करु नये. सहकार्य करावे, ही विनंती!"
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world