गद्दारांचे काय? जाहीर सभेत चिठ्ठी आली अन् शरद पवार गरजले, नेमकं काय घडलं?

सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शरद पवार यांच्या जाहीर सभांचा धडाका सुरु आहे. शरद पवार यांनी वाई- खंडाळा महाबळेश्वर विधानसभेत अरुणादेवी पिसाळ यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली.

जाहिरात
Read Time: 2 mins

संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आता सातारा जिल्ह्याकडे मोर्चा वळवला आहे.  आज सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शरद पवार यांच्या जाहीर सभांचा धडाका सुरु आहे. शरद पवार यांनी वाई- खंडाळा महाबळेश्वर विधानसभेत अरुणादेवी पिसाळ यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

 काय म्हणाले शरद पवार?

'बऱ्याच दिवसातून तुमच्याशी सुसंवाद साधण्याची संधी मिळाली. आमचे एकेकाळचे मित्र मकरंद पाटील यांनी दिली. मी राज्याच्या कानाकोपऱ्यात गेलो. नागपूरपासून दौऱ्याची  सुरुवात केल्यानंतर वर्धा, अकोला, यवतमाळ, जालना, बुलढाणा, बीड कोल्हापूर, सांगली करुन आज इथे तुमच्यासमोर आहे. मी जाईल तिथे ऐकायला मिळतयं आज सत्ता ज्यांच्या हातात त्यांच्याकड़ून महाराष्ट्राचे प्रश्न सुटू शकत नाहीत.'

'याआधी लोकसभेला राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या, काँग्रेसला १ मिळाली.आम्ही  अस्वस्थ होतो. त्यानंतर आम्ही ठरवलं येणारी निवडणूक एकत्र लढायची. त्या निवडणुकीत आम्हाला यश मिळाले. त्यानंतर आता विधानसभेची निवडणूक आली. प्रश्न खूप आहेत. गेली दहा वर्ष महाराष्ट्राची सत्ता भाजप आणि त्यांच्या मित्रांच्या हातात आहे. लोकसभेच्या  निकालानंतर त्यांना समजलं लोकांचा दृष्टीकोन बदलला आहे. त्यानंतर त्यांनी लाडकी बहीण योजना आणली.' असं शरद पवार म्हणाले. 

नक्की वाचा: अखेरच्या टप्प्यात मनोज जरांगेंचा डाव! भुजबळांच्या बालेकिल्ल्यातून मोठी घोषणा

जाहीर सभेत चिठ्ठी आली...

यावेळी बोलत असतानाच शरद पवार यांना एक चिठ्ठी आली. गद्दारांचे काय? असा सवाल या चिठ्ठीमध्ये विचारला होता. त्यावर शरद पवार यांनीही जाहीर सभेत ती चिठ्ठी वाचून दाखवली अन् ज्यांनी गद्दारी केली त्यांना पाडा, पाडा, पाडा असे थेट आव्हानच वाई मतदार संघातील जनतेला केले. शरद पवार यांच्या या आवाहनानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी बोलताना शरद पवार यांनी अरुणादेवी पिसाळ यांना निवडून आणण्याचे आवाहन केले. 

महत्वाची बातमी: 'नरेंद्र मोदींची मेमरी लॉस' राहुल गांधींचा हल्लाबोल