नागिंद मोरे, धुळे
धुळे जिल्ह्यातील शिरपूर परिसरात मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 'शिरपूर फर्स्ट' संघटनेने एक अनोखे आणि उपरोधिक आंदोलन केले आहे. महामार्गावरील खड्ड्यांमध्ये बसून चक्क सत्यनारायण पूजा घालत कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला. महामार्गावरील एका मोठ्या खड्ड्यात चौरंग मांडून, हार-फुले वाहून सत्यनारायण पूजा करण्यात आली.
26 लाखांचा निधी गेला कुठे?
आंदोलकांनी प्रशासनाला विचारलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे निधीचा विनियोग. परिवहन विभागाने या महामार्गावरील खड्डे दुरुस्त करण्यासाठी 26 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. निधी मंजूर असूनही रस्त्यावर साधे पॅचवर्कही झाले नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
(नक्की वाचा- Ajit Pawar Plane Case: अजितदादांच्या अपघात प्रकरणी सर्वात मोठी अपडेट; व्ही के सिंगचा CID समोर खळबळजनक दावा)
दोन टोल नाके, तरीही खड्डेच
शिरपूर ते खलघाट (सेंदवा) या 60 किलोमीटरच्या अंतरात शिरपूर आणि खलघाट असे दोन टोल नाके आहेत. वाहनधारकांकडून नियमित टोल वसूल केला जातो, मात्र रस्ता देण्याच्या नावावर प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे संघटनेचे प्रमुख हंसराज चौधरी यांनी सांगितले.
'शिरपूर फर्स्ट'चा तीव्र इशारा
या अनोख्या आंदोलनानंतर शिरपूर फर्स्टचे चेतन मोरे, धम्मदीप मोरे आणि हंसराज चौधरी यांनी परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. जर येत्या काही दिवसांत जीवघेणे खड्डे बुजवण्यात आले नाहीत, तर यापुढे महामार्ग रोखून अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या खड्ड्यांमुळे दररोज छोटे-मोठे अपघात होत असून अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत, याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
(नक्की वाचा- Pune News: पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची यादी जाहीर; भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून कुणाला संधी?)
आंदोलनाची सर्वत्र चर्चा
भर महामार्गावर खड्ड्यात बसून केलेली ही पूजा पाहण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. सोशल मीडियावरही या 'सत्यनारायण पूजे'चे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world