संकेत कुलकर्णी, पंढरपूर
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. गोपाळपूर रोडवरील दर्शन रांगेत अचानक एक 5 फुटांचा मोठा साप आढळून आल्यामुळे परिसरात एकच घबराट उडाली आणि भाविकांची मोठी पळापळ झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपाळपूर रोडवर असणाऱ्या पत्रा शेडजवळ हा साप आढळून आला. सध्या या पत्रा शेडजवळ नवीन दर्शन मंडपाचे काम वेगाने सुरू आहे. या कामासाठी परिसरात मोठे खड्डे खणण्यात आले आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने याच खड्ड्यांच्या आश्रयाने आलेला हा साप रांगेत आला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दर्शन रांगेत अचानक इतका मोठा साप समोर आल्याने काहीसा गोंधळ उडाला.
सर्पमित्राच्या तत्परतेने अनर्थ टळला
साप निघाल्याची माहिती मिळताच मंदिर प्रशासन आणि तेथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांनी तातडीने स्थानिक सर्पमित्राशी संपर्क साधला. काही वेळातच सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अतिशय काळजीपूर्वक व तातडीने त्या सापाला जिवंत पकडले. सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी नेल्यानंतर भाविकांनी सुटकेचा श्वास सोडला.
एफडीए नियमांनुसार विठ्ठल प्रसाद
विठ्ठलाचा मुख्य प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू भाविकांना दिला जातो. लाखो वारकऱ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन आणि प्रसादाच्या पवित्रतेची खात्री देण्यासाठी मंदिर समितीने एफडीएचे अधिकृत प्रमाणपत्र मिळवले आहे. लाडू बनवणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि स्वच्छता, निर्मिती कक्षाची निर्जंतुकीकरण प्रक्रिया आणि पॅकेजिंगच्या पद्धतींवर एफडीएच्या मानकांचा कडक वॉच आहे.
मालाच्या तपासणीनंतरच लाडू निर्मिती
प्रसादासाठी वापरले जाणारे बेसन, तूप, साखर, वेलची आणि इतर सर्व साहित्याची आधी प्रयोगशाळेत काटेकोर तपासणी केली जात आहे. हा सर्व कच्चा माल सर्वोत्तम दर्जाचा असल्याचा अहवाल आल्यानंतरच तो लाडू बनवण्यासाठी पुढे वापरला जातो. वारीच्या काळात लाखो वारकऱ्यांच्या हातामध्ये अतिशय सुरक्षित आणि स्वादिष्ट प्रसाद पडावा, यासाठी मंदिर समिती दिवसरात्र काम करत आहे. यामुळे भाविकांच्या आरोग्याची सुरक्षा तर होणार आहेच, शिवाय प्रसादाचा दर्जाही उच्च दर्जाचा राखला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world