
सौरभ वाघमारे, सोलापूर
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षपूर्तीनिमित्त आणि राष्ट्रपती पद्धतीने घोषित केलेल्या 'सेवा पंधरवडा' उपक्रमांतर्गत विविध जनकल्याणकारी कार्यक्रम राबवण्याचे आदेश दिले आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून मराठा समाजातील पात्र लाभार्थ्यांना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या उपक्रमाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 17 सप्टेंबर 2025 पासून होईल आणि तो राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी, 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत सुरू राहील. जिल्ह्यातील महसूल विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा 'सेवा पंधरवडा' राबवला जाणार आहे.
कुणबी प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार, मराठा समाजातील पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली जातील. या शिबिरांमध्ये अर्जदारांना आवश्यक मार्गदर्शन आणि कागदपत्रांची पडताळणी करण्याची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल. शासनाच्या नव्या जीआरनुसार (GR) ही मोहीम राबवण्यात येणार आहे. ज्यामुळे पात्र लोकांना जलद आणि पारदर्शक पद्धतीने प्रमाणपत्र मिळेल अशी अपेक्षा आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणाचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
(नक्की वाचा- Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचा पुरावा: 'हैदराबाद' आणि 'सातारा' गॅझेटियर नेमकं काय आहे?)
प्रत्येक तालुक्यात 1000 प्रमाणपत्र देणे सक्तीचे
सेवा पंधरवड्यात 1000 मराठा आरक्षण प्रमाणपत्रे देणे सक्तीचे असणार आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार सेवा पंधरवड्यात प्रत्येक तालुक्यात किमान 1000 मराठा आरक्षण प्रमाणपत्रे वाटप करण्याची सक्ती करण्यात आली आहे. हा उपक्रम पुणे विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आला आहे.
( नक्की वाचा : Maratha Reservation : 'कुणबी' दाखल्यासाठी अर्ज कसा कराल? वाचा सरकारी GR मधील संपूर्ण माहिती, सोप्या शब्दात! )
या उपक्रमांतर्गत केवळ मराठा समाजासाठीच नव्हे, तर इतर अनेक लोककल्याणकारी कार्यक्रम राबवले जाणार आहेत. यात आरोग्य शिबिरे, स्वच्छता अभियान, शिक्षणविषयक कार्यक्रम आणि शासकीय योजनांसाठी अर्ज स्वीकारणे यांसारख्या गोष्टींचा समावेश असेल. सोलापूर जिल्ह्यासाठी हा एक मोठा आणि महत्त्वाचा उपक्रम मानला जात आहे, जो नागरिकांना थेट लाभ पोहोचवण्यासाठी महत्त्वाचा ठरेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world