Solapur News : दक्षिणेतील कांतारा या चित्रपटातून तेथील स्थानिक भूता-कोला या अनोख्या धार्मिक परंपरेविषयी माहिती झाली. महाराष्ट्रातही अशा अनेक प्रथा-परंपरा गेल्या शेकडो वर्षांपासून सुरू आहे. कर्नाटकापासून अवघ्या ३० ते ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील वळसंग या गावातील अशी एक परंपरा गेल्या अडीचशेहून अधिक काळापासून अविरत सुरू आहे.
वळसंग गावातील बाळबट्टल सोहळा नेमका काय आहे?
सोलापूर जिल्ह्यातील वळसंग या गावात गेल्या अडीच शेहून अधिक काळापासून एक अनोखी प्रथा-परंपरा राबवली जात आहे. ज्याचं नाव आहे बाळबट्टल. वळसंग गावात ग्रामदैवत श्री रामलिंग चौडेश्वरी देवीच्या यात्रेचं आयोजन केलं जातं. या यात्रेच्या दिवशी पारंपरिक बाळबट्टल सोहळ्याचं आयोजन केलं जातं. नुकतीच सोलापूरच्या वळसंग गावातील श्री. रामलिंग चौडेश्वरी यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे. बाळबट्टल हे या यात्रेचे मुख्य आकर्षण असते. हातात तलवार आणि चांदीची वाटी घेऊन हा बाळबट्टल गावात प्रदक्षिणा घालतो. या बाळबट्टलच्या पायात 40 किलो वजनाचे पारंपरिक 300 घडाचे घुंगरू असतात. यात्रेसाठी सुमारे 12 किलोमीटरची गाव प्रदक्षिणा मार्ग असून ती तब्बल 7 तास चालते. 'ये तम्मा, बाळबट्टल बत्तरो' म्हणजे ये भाऊ, बाळबट्टल आला अशा आरोळ्या ठोकत हातात मशाली घेऊन गावाबाहेर धावणाऱ्या युवकांना पाहून अंगावर शहारे येतात. हटगार कोष्टी समाजाची आराध्यदैवत चौंडेश्वरी देवी तिच्यासाठी ही यात्रा भरते.
बाळबट्टलची आख्यायिका काय आहे?
कर्नाटकातील माशा हे चौडेश्वरी देवीचं प्रमुख स्थान. येथे आधी चांदीच्या वाटीमध्ये अग्नी प्रज्वलित करून मिरवणूक काढली जात होती. मात्र तब्बल शेकडो वर्षांपूर्वी वळसंग गावातील वीरू नावाच्या एका तरुणाने ही चांदीची वाटी घेऊन वळसंगच्या दिशेने पोबारा केला होता. त्याला शोधण्यासाठी माशळच्या गावकऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. मात्र वीरू जंगलातून चांदीची वाटी घेऊन पळाला होता. शेवटी वळसंगच्या वेशीवर गावाच्या संरक्षक भिंतीच्या तटवंदीच्या दरवाज्यातून त्याने ही चांदीची वाटी आत टाकली अन् वीरू पळून गेला. माशाळच्या लोकांनी त्याला पकडून ठार केलं अन् शीर धडावेगळं केलं. वळसंग गावकऱ्यांनी मात्र ती वाटी घेत गावात यात्रेची प्रथा सुरू केली. दिंडूर रस्त्यावरील वीरूच्या समाधीला नैवेद्य दाखवून या यात्रेची सुरुवात होते. या यात्रेमध्ये गावकरी गावाभोवती संरक्षण भिंत तयार करतात. आणि बाळबट्टल गावाभोवती प्रदक्षिणा घातलो.
यंदाही मोठा जनसागर उसळला...
सोलापूर जिल्ह्यातील वळसंग गावाचे ग्रामदैवत श्री रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रेच्या तिसऱ्या दिवशी पारंपरिक 'बाळबट्टल' सोहळ्यासाठी हजारो भक्तांचा अभूतपूर्व महासागर लोटल्याचे दिसून आलं. रात्रीपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तब्बल नऊ तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या या भव्य मिरवणुकीने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. भक्ती अन् परंपरेचा जागर यात्रेच्या तिसऱ्या दिवशी वळसंग गावात दिसून आला. पारंपरिक वाद्यांच्या नगाऱ्यात आणि देवीच्या जयघोषात 'बाळबट्टल' मिरवणुकीस प्रारंभ झाला. संपूर्ण गावामध्ये ग्रामप्रदक्षिणा घालत, भाविकांच्या अलोट उत्साहात ही मिरवणूक मुख्य मंदिरात परतली. गावातील प्रमुख मार्गांवर मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी महिलांनी घरांसमोर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. तर तरुणांनी फुलांची मोठी उधळण केली. अतिशय भक्तीपूर्ण वातावरणात या सोहळ्याची सांगता करण्यात आली.