जाहिरात

ST Bus Strike : लाल परी थांबली, प्रवाशांचे हाल; तुमच्या जिल्ह्यात काय आहे परिस्थिती? 

लाल परींच्या चालकांनी संप पुकारल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ST Bus Strike : लाल परी थांबली, प्रवाशांचे हाल; तुमच्या जिल्ह्यात काय आहे परिस्थिती? 
मुंबई:

राज्यभरातील एसटीच्या (Maharashtra ST Bus Strike) विविध संघटनांनी संप पुकारला आहे. ऐन सणासुदीच्या काळात लाल परीच्या चालकांनी संप पुकारल्याने प्रवाशांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. दरवर्षी लाखो संख्येने नागरिक कोकणात आणि आपआपल्या गावी जात असतात. मात्र लाल परींच्या चालकांनी संप पुकारल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. (ST Bus Strike)

एसटी कामगार संघटनांच्या संपामुळे कोणत्या जिल्ह्यात काय परिणाम?

नाशिक - नाशिक जिल्ह्यातील 13 आगारातून एकही बस आज डेपोतून बाहेर पडली नसल्याचं कृती समितीच्या वतीने सांगण्यात येतंय. एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाले असून नाशिकमध्ये पंचवटी डेपोच्या प्रवेशद्वारावरच राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यासोबतच शहरात देखील एकही बस रस्त्यावर धावत नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

लातूर - लातूर जिल्ह्यातल्या पाच बस डेपोमधील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. जिल्ह्यातील 2700 एसटी कर्मचारी संपावर उतरले आहेत. त्यामुळे 
लातूर जिल्यातील पाच डेपोमधील 550 एसटी बसच्या फेऱ्या थांबल्याने एका दिवसाला एसटी महामंडळाला 50 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. 

अमरावती - अमरावती जिल्हा मध्यवर्ती बस स्थानक व ग्रामीण भागातील सर्व एसटी डेपो बंद असून सर्व एसटीचे चाके थांबली आहे,तर एसटी कर्मचाऱ्याचं आंदोलन सुरू झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले आहे तर दुसरीकडे अमरावती एसटी बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी निर्माण झाली आहे.

नक्की वाचा - ST Bus Strike : ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांना मोठा फटका, लाल परीला ब्रेक!

वाशिम - जिल्ह्यातील कारंजा,वाशिम,रिसोड आणि मंगरुळपिर या 4 ही एसटी आगारातून आज सकाळपासून एक ही बस बाहेर गावी न गेल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत. वाशिम आगारातील एकूण 304 बसफेऱ्या बंद असून मंगरुळपिर आगारातील एकूण 184 बसफेऱ्या बंद आहेत. 
कारंजा आगारातील एकूण 156 बसफेऱ्या बंद आहेत. रिसोड आगारातील एकूण 247 बस फेऱ्या बंद. वाशिम जिल्ह्यातील कारंजा,वाशिम,रिसोड आणि मंगरुळपिर एसटी बस आगारातील एकूण 891 बस फेऱ्या बंद असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. 

अकोला - पहाटेपासून अकोला आगारामधून एकही बस निघाली नाही. अकोला मध्यवर्ती बस स्थानकावर आज सकाळी सहा वाजता पासूनच इथल्या एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे... विविध मागण्यांसाठी हा एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे.

धाराशिव - राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागणीसाठी पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याचा इशारा मागच्या आठवड्यात दिला होता.  त्यानुसार धाराशिव आगारातून आज सकाळी लवकर जाणाऱ्या दहा गाड्या त्यांच्या नियोजित वेळेस सुटल्या परंतु सकाळी आठ वाजता कर्मचाऱ्यांनी एकत्र येत काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतली. त्यानंतर प्रशासनाने एसटीच्या सर्व फेऱ्या रद्द केल्या आहेत. 

नक्की वाचा - पालेभाज्यांच्या दरात रेकॉर्डतोड वाढ; दर 400 पार, कोथिंबिरीला गावठी कोंबडीचा भाव

एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून आंदोलन पुकारण्यात आलं असून या आंदोलनामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या आंदोलनात एकूण 15 संघटना सहभागी असल्याने जिल्ह्यातील चारी आगारांमधून अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिकांना याच्या मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नंदुरबार जिल्हा हा गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरती असल्याने अनेक गाड्या मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात जात नाही. त्यामुळे याचा फटका महामंडळाला सहन करावा लागत आहे. राज्य शासनाप्रमाणेच आम्हाला सवलती द्या या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संघटना आंदोलनावर उतरल्या आहेत. त्यामुळे  आंदोलन किती दिवस सुरू राहणार असाच प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.