रामराजे शिंदे, दिल्ली: विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर महायुतीमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्याने मुख्यमंत्री त्यांचाच होणार असल्याचे दिसत आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. शिंदे- फडणवीसांमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन कलगीतुरा रंगलेला असतानाच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदावरुन भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटामध्ये सुरु असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिकाही स्पष्ट केली.
नक्की वाचा: धर्मांतर करून आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
काय म्हणाले सुनील तटकरे?
'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतली. अमित शाह यांचे आभार मानावे हाच उद्देश भेटीचा होता. जागा वाटपासून रणनितीपर्यंत अमित शाह यांचे सहकार्य लाभले. पंतप्रधान मोदींचे आम्हाला पाठबळ मिळालं. महाराष्ट्राच्या जनतेने प्रचंड विश्वास दर्शवला. यात मोदीजींचा सिंहाचा वाटा होता. सरकार स्थापनेबद्दल जी काही चर्चा करायची आहे त्याचे अधिकार अजित पवार यांना दिले आहेत. भाजपच्या १३३ जागा आल्या. त्यांचा मुख्यमंत्री होईल हे स्वाभाविक आहे. तरी सुद्धा ते चर्चा करून निर्णय घेतील,' असंही सुनील तटकरे यावेळी म्हणाले.
राष्ट्रवादीचा जुना डाव?
राष्ट्रवादी अजित पवार गटाने मुख्यमंत्रीपदावरुन कोणताही वाद न घालता भाजपला दर्शवलेला पाठिंबा म्हणजे एक प्रकारे एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न आहे का? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. 2014 मध्ये शरद पवार पक्षाचे अध्यक्ष असताना राष्ट्रवादीने भारतीय जनता पक्षाला बाहेरुन पाठिंबा दर्शवला होता. शरद पवारांच्या या खेळीने उद्धव ठाकरेंची ताकद कमी झाली अन् त्यांना मिळेल ती मंत्रीपदे पदरात पाडून समाधान मानावे लागले. त्यानंतर सत्तेत असूनही शिवसेनेची भाजपने केलेली फरफट संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली.
आता 10 वर्षानंतर तीच परिस्थिती निर्माण झाली असून एकनाथ शिंदेही मुख्यमंत्रीपदावर दावा करत आहेत. अशातच अजितपवार यांच्या राष्ट्रवादीने टाकलेला हा जुनाच डाव पुन्हा नव्याने खेळण्याची तयारी सुरु केली आहे का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहेत. यावर अंतिम निर्णय काय होणार, याचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.
महत्वाची बातमी: शिंदेंनी आपल्या आमदारांना मतदार संघात जायला का सांगितलं? मोठं कारण आलं समोर