उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात झालेल्या दगडफेकीच्या तुरळक घटनांमुळे आणि जमाव रस्त्यावर उतरल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक, जळगाव,शिर्डी अहमदनगर आणि छत्रपती संभाजनीगरच्या काही भागांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. काही ठिकाणी पोलिसांनी समजूत काढत तर काही ठिकाणी हलका लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली. रामगिरी महाराजांनी केलेले एका समाजाबाबत केलेले वक्तव्य आणि बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चांमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे कळते आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बांगलादेशात हिंदूवर सुरू असलेल्या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी 'सकल हिंदू समाज'ने बंदचे आवाहन केले होते. उत्तर महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये या बंदच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाले. विविध शहरांमध्ये बांगलादेशातील हिंदूवर सुरू असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी मोर्चे काढण्यात आले होते. जळगावमध्ये एका शोरूमवर दगडफेक करण्यात आली. बंदमध्ये सहभागी न झाल्याने ही दगडफेक करण्यात आली होती असे कळते आहे. जळगांवमध्ये मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपले म्हणणे निवेदनाच्या माध्यमातून सोपवले आहे.
नाशिकमध्ये लाठीचार्ज
नाशिकमध्येही मोर्चादरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भद्रकाली परिसरात बंदची हाक दिली असतानाही काही दुकाने उघडी का ठेवली असा जाब विचारत मोर्चेकऱ्यांनी दुकानदारांना जाब विचारला होता. यामुळे इथे तणाव निर्माण झाला. याच भागात दोन गटांमध्ये दगडफेकही झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत लाठीचार्ज केला ज्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत झाली. मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर म्हटले की, "मोर्चा सुरू असताना काही दुकाने उघडी होती. त्यामुळे शाब्दीक बाचाबाची झालीय. मी सगळ्यांना शांतता राखण्याचे आवाहन करतोय. मी पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो असून परिस्थिती नियंत्रणात आहे."
रामगिरी महाराजांच्या वक्तव्यामुळे संभाजीनगरात तणाव
छत्रपती संभाजीनगरमध्ये रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पैठण गेट आणि सिटी चौकात मोठा जमाव जमला होता. रामगिरी महाराजांनी काढलेल्या उद्गारांच्याविरोधात हा जमाव जमला होता. रामगिरी महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जमावाकडून करण्यात आली होती. वैजापूर आणि गंगापूरमध्येही जमाव रस्त्यावर उतरला होता, पोलिसांनी जमावाची समजूत काढली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. वैजापूरमध्ये रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर जमाव शांत झाला.
एकनाथ शिंदेंची रामगिरी महाराजांच्या हरीनाम सप्ताहाला हजेरी
नाशिकपासून जवळ असलेल्या सिन्नरमध्ये हरीनाम सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. शिंदे यांनी रामगिरी महाराजांच्या सत्कारासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना म्हटले की, "महाराष्ट्राला संत परंपरा आहे, संतांच्या आशिर्वादाने राज्यकारभार सुरू आहे. म्हणून या महाराष्ट्रात संतांच्या केसाला धक्का लावण्याची हिम्मत कोणी करू शकणार नाही." तर रामगिरी महाराज यांना त्यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता त्यांनी म्हटले की," हिंदू धर्मीय सहीष्णू आहेत मात्र सहीष्णूतेचा कोणी अंत पाहात असेल तर अशा वेळी आपण मजबूत राहीले पाहीजे, यासाठी आपण ते वक्तव्य केले होते. माझ्या वक्तव्याबद्दल जे परीणाम होतील त्याला मी सामोरा जाण्यास तयार आहे."
बांगलादेशात नेमके काय घडले?
बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्दावरून आंदोलन सुरू झाले होते. हे आंदोलन हिंसक बनल्यानंतर शेख हसीना यांना 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधानपद सोडून बांगलादेशातून पळून जावे लागले होते. तिथली परिस्थिती ही अत्यंत भीषण बनली असून बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार सुरू झाले आहेत. बांगलादेशातील 48 जिल्ह्यांमध्ये किमान 278 ठिकाणी हिंदूंवर जीवघेणे हल्ले करण्यात आल्याचे पीटीआयने वृत्त दिले आहे.