
रिझवान शेख, ठाणे: दोन दिवसांपूर्वी ठाणे स्टेशन परिसरामध्ये एका मराठी तरुणाला परप्रांतीयांकडून अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तीन ते चार परप्रातीयांनी मराठी तरुणाला अत्यंत निर्दयीपणे मारलं होते, ज्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. याचबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आली असून त्या परप्रातीयांनी मारहाण केलेल्या मराठी तरुणाची पाया पडून माफी मागितली आहे.
नेमकं काय घडलं?
गेल्या दोन दिवसांपूर्वी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात एका मराठी तरुणास परप्रांतीय दुकानदारांकडून मारहाणीची घटना घडली होती. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांच्या ठाण्यातील कार्यालयात संबंधित परप्रांतीय दुकानदाराला बोलावण्यात आले. शिवसैनिकांच्या उपस्थितीत शन्मुख पुजारी आणि सुरज जयस्वाल या दोघांनी कान धरले आणि मराठी तरुणाच्या पाया पडून क्षमा मागितली.
तुम्ही एका तरुणाला पाच ते सहा जणांनी मिळून किती अमानुषपणे मारलं. व्हिडिओमध्ये दिसत आहे. तुम्ही त्याचा एक फटका खाल्ला तर काय एवढं? एवढी चरबी चालणार नाही. महाराष्ट्र आहे, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी परप्रांतीय तरुणांना सज्जड दम दिला. यावेळी मारहाण झालेल्या मराठी तरुणानेही त्यांच्या कानाखाली आवाज काढला.
दरम्यान, मारहाणीत जखमी झालेला मराठी युवक ठाण्यातील लोकमान्यनगर परिसरामध्ये राहतो. तो दररोज ठाणे स्टेशनवरून प्रवास करत असतो. ठाणे स्टेशनहून लोकमान्यनगरला आपल्या घरी जात असताना त्याचा रिचार्ज संपला म्हणून तो ठाणे स्टेशनजवळील मोबाईल शॉपमध्ये गेला, यावेळी मोबाईल रिचार्जवरुन त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. यावरुनच दुकानदारांनी संबंधित मराठी तरुणाला मारहाण केली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world