कोकणच्या विकासाला चालना देण्यासाठी रेवस ते रेड्डी या सागरी महामार्ग प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. 523 किमीच्या या महामार्गाचे चौपदीकरण करण्यात येणार असून या प्रकल्पाची किंमत 26,463 कोटी रुपये आहेत. तसेच या मार्गावर 9 महत्वाचे पूल उभारण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सदस्य ॲड निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुसे बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये सदस्य श्रीकांत भारतीय यांनी सहभाग घेतला. सागरी महामार्गाचा प्रकल्प दोन टप्प्यात राबवला जाणार असल्याचे सांगून मंत्री भुसे म्हणाले की, या महामार्गावर रेवस, कारंजा, रेवदंडा, आगरदंडा, बाणकोट, केळशी, दाभोळ, जयगड, काळबादेवी आणि कुणकेश्वर या 9 ठिकाणी पूल उभारण्यात येणार आहेत.
(नक्की वाचा- पुणे-नाशिक अंतर 2 तासांनी कमी होणार? सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच सुरू होणार)
या कामापैकी 5 पुलांच्याच्या वर्क ऑर्डर देण्यात आल्या आहेत. पूर्वीचा 5 ते 7.5 मीटरच्या सागरी महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम होते. त्याऐवजी आता हा रस्ता चौपदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
(नक्की वाचा- मध्य रेल्वेवर प्रवाशांना दररोज 10,000 तर आठवड्याला 50,000 रुपये जिंकण्याची संधी, CR चा धमाकेदार उपक्रम)
रायगड जिल्ह्यातले 26, रत्नागिरी जिल्ह्यातले 36 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 31 पर्यटनस्थळांना जोडण्यासाठी जोडरस्त्यांचे काम करण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे कोकणातील पर्यटनाला गती मिळून अर्थव्यवस्थेस मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार असल्याचेही मंत्री भुसे यांनी सांगितले.