जाहिरात

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या नावावर ग्रामीण भागात नवा खेळ; एका मेसेजमुळे हजारो दूध उत्पादकांना टेन्शन

Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंच्या नावाचा वापर करत काही समाजकंटकांनी ग्रामीण भागातील एका मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या व्यवसायाला बदनाम करण्याचा डाव रचल्याचे उघड झाले आहे.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या नावावर ग्रामीण भागात नवा खेळ; एका मेसेजमुळे हजारो दूध उत्पादकांना टेन्शन
Tukaram Mundhe Action : या मेसेजमुळे हजारो शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
धाराशिव:

ओंकार कुलकर्णी, प्रतिनिधी

Tukaram Mundhe Action: अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात दूध आणि खवा भेसळीविरोधात जोरदार मोहीम सुरू आहे.  मात्र, याच भीतीचा गैरफायदा घेत काही समाजकंटकांनी ग्रामीण भागातील एका मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या व्यवसायाला बदनाम करण्याचा डाव रचल्याचे उघड झाले आहे.  सोशल मीडियावर एका प्रसिद्ध डेअरीबाबत अशी काही वादळी बातमी पसरवली गेली, ज्यामुळे हजारो शेतकरी आणि दूध उत्पादकांमध्ये अचानक गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

एका व्हायरल मेसेजमुळे खळबळ

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर एक संदेश वेगाने फिरत आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातील मराठवाडा दूध डेअरीवर अचानक छापा टाकून मोठी कारवाई केल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला होता. हा मेसेज वाऱ्यासारखा पसरला आणि संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात परएकच खळबळ उडाली. तुकाराम मुंढे यांचे नाव जोडले गेल्यामुळे लोकांनीही कोणत्याही पडताळणीशिवाय या बातमीवर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली. यामुळे वर्षानुवर्षे विश्वासाने सुरू या दूध संकलन केंद्राच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला.

शेतकऱ्यांची चिंता आणि अफवेचा फटका

धाराशिव जिल्ह्यातली मराठवाडा दूध डेअरी परिसरातील अनेक गावांमधील हजारो शेतकऱ्यांशी जोडलेली आहे. दररोज लाखो लीटर दूध संकलन करणाऱ्या या संस्थेवर कारवाई झाल्याची बातमी ऐकताच दूध उत्पादक शेतकरी कमालीचे चिंतेत पडले. उद्यापासून आपले दूध घेतले जाणार की नाही, दूध संकलन केंद्र कायमचे बंद होणार का, अशा अनेक शंका शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाल्या. 

काही तासांतच या अफवेचा थेट परिणाम ग्रामीण भागातील आर्थिक चक्रावर आणि दुग्ध व्यवसायाशी संबंधित असलेल्या घटकांवर स्पष्टपणे दिसू लागला.

( नक्की वाचा : 40 किलोमीटरवरून बिर्याणी खायला आले, पण प्लेटमध्ये जे दिसले...; आता थेट तुकाराम मुंढेंकडे होणार तक्रार )
 

प्रामाणिक व्यावसायिकांसमोर नवे संकट

दुग्ध व्यवसायातील जाणकारांच्या मते, बाजारातील भेसळ रोखण्यासाठी शासकीय पातळीवर होणाऱ्या कठोर कारवायांचे नेहमीच स्वागत आहे. कारण, यामुळे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या संस्थांना आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळतो. मात्र, कोणत्याही अधिकृत सरकारी आदेशाशिवाय किंवा पुष्टीशिवाय केवळ सोशल मीडियावरून एखाद्या संस्थेचे नाव बदनाम करणे अत्यंत घातक आहे. 

मुंढे यांच्या धडक कारवायांमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले असले, तरी त्याच भीतीचा गैरफायदा घेऊन काही खोडसाळ लोक प्रामाणिक व्यावसायिकांना टार्गेट करत असल्याचे आता समोर येत आहे.


( नक्की वाचा : Kalyan News: एका खरेदीनंतर संपले सुखी कुटुंब... कल्याणमधील धक्कादायक हत्येचं कारण उघड )
 

सोशल मीडियावरील माहितीची पडताळणी आवश्यक

या संपूर्ण प्रकारानंतर डिजिटल माध्यमांवरील बातम्यांची सत्यता तपासण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियावर दिसणारा प्रत्येक मेसेज किंवा बातमी शंभर टक्के खरी असतेच असे नाही. अशा खोट्या अफवांमुळे दूध संकलन केंद्रे आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या हजारो गरीब शेतकरी कुटुंबांना नाहक मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. 

त्यामुळे प्रशासनाच्या चांगल्या मोहिमेला अशा अफवांमुळे गालबोट लागू नये आणि नागरिकांनीही अशा कोणत्याही अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आता दुग्ध व्यवसायिकांकडून केले जात आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com