जाहिरात

Tukaram Mundhe :IAS तुकाराम मुंढे यांच्यावर थेट निलंबनाची तलवार; भाजपा आमदारांचा 'धमकी'चा आरोप, विधानसभेत खळबळ

Tukaram Mundhe :  राज्यात नेहमीच आपल्या कार्यपद्धतीमुळे चर्चेत राहिलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Tukaram Mundhe :IAS तुकाराम मुंढे यांच्यावर थेट निलंबनाची तलवार; भाजपा आमदारांचा 'धमकी'चा आरोप, विधानसभेत खळबळ
मुंबई:


सागर जोशी प्रतिनिधी

Tukaram Mundhe :  राज्यात नेहमीच आपल्या कार्यपद्धतीमुळे चर्चेत राहिलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) आमदार कृष्णा खोपडे यांनी मुंढे यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले असून, विधिमंडळात त्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी केली आहे. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'विधीमंडळाच्या सदस्याला धमकी येणं ही गंभीर बाब आहे,' असे सांगत सविस्तर माहिती घेऊन सभागृहात निवेदन करण्याचं आश्वासन दिलं आहे.

काय आहेत गंभीर आरोप ?

भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि प्रवीण दटके यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विशेष लक्षवेधी सूचना मांडत तुकाराम मुंढे यांना लक्ष्य केले. आमदार खोपडे यांनी गंभीर आरोप केला की, त्यांनी मुंढे यांच्या कथित गैरव्यवहारांविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना फोनवरून धमक्या येऊ लागल्या. 

'या धमक्यांमुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे,' असा दावा आमदार खोपडे यांनी विधानसभेत केला. सभागृहात या विषयावर बोलणार असल्याची चर्चा बाहेर होताच धमकीचे फोन आले, असे त्यांचे म्हणणे आहे. या धमक्यांमध्ये 'तुकाराम मुंढे यांच्याविरोधात बोलू नका, नाहीतर गंभीर परिणाम होतील,' असा इशारा देण्यात आल्याचे खोपडे यांनी सांगितले आणि त्यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल केल्याची माहिती दिली.

( नक्की वाचा : Nagpur News : नागपूरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा! पुण्यातील गंभीर प्रकरणात महिलेचा टोकाचा प्रयत्न,प्रकरण काय? )

आमदार कृष्णा खोपडे यांनी तुकाराम मुंढे यांच्यावर नागपूर महापालिकेतील कारभारासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की, मुंढे 2020 मध्ये नागपूर महापालिकेत रुजू झाले आणि केवळ 7 महिन्यांच्या कालावधीत त्यांनी मनमानी कारभार केला. 'स्मार्ट सिटी' प्रकल्पाचे अधिकार नसतानाही त्यांनी स्वतःचे अधिकार वापरले. तसेच, कोणतीही योग्य मान्यता नसताना ठराविक कंत्राटदारांना धनादेश (checks) वितरित केले.

खोपडे यांनी त्यावेळी या गैरव्यवहारांचे पुरावे सादर करत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचेही सांगितले. एवढेच नाही, तर स्मार्ट सिटीच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी धनादेशांवर सही करण्यास नकार दिल्याने मुंढे यांनी त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोपही त्यांनी केला. यापूर्वी, अनिल देशमुख यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचेही खोपडे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचा इशारा

आमदार खोपडे यांच्या बाजूने आमदार प्रवीण दटके यांनीही मुंढे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात यावर स्पष्ट निवेदन केलं. 'विधीमंडळाच्या सदस्याला धमकी येणं ही गंभीर बाब आहे,' असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, 'तुकाराम मुंढे आणि त्यांच्या कारभारासंदर्भातली सगळी सविस्तर माहिती घेऊन सभागृहात निवेदन केलं जाईल.'

तुकाराम मुंढे यांची मागील 20 वर्षांच्या कार्यकाळात तब्बल 24 वेळा बदली झाली आहे. त्यामुळे आता या नवीन आरोपांनंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार, की त्यांची पुन्हा 25 वी बदली केली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com