शरद सातपुते, सांगली
महाराष्ट्रातील तासगाव कवठेमंकाळ विधानसभा या मतदारसंघाकडे पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील आणि त्यांच्या विरोधात दोन वेळा खासदार असणारे संजय काका पाटील आहेत. यामुळे तासगावची लढाई अटीतटीची बनली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या विधानसभेकडे लागलं आहे.
चारच दिवसांपूर्वी अजित पवार यांनी दिवंगत आर आर पाटील यांच्यावर सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर सही केल्याचा आरोप केला होता. यामुळे पुन्हा तासगाव महाराष्ट्रभर चर्चेत आलं. अजित पवार यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाल्याचे दिसून आले. हे प्रकरण थंड होत असताना तासगाव विधानसभा मतदारसंघात पैसे वाटताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते सापडले आहेत.
(नक्की वाचा- 'क्लिन बोल्ड डिपॉझिट गुल' पहिल्याच सभेत मुख्यमंत्र्यांची जोरदार फटकेबाजी)
तासगाव येथील काका नगरमध्ये फराळाच्या पाकीटमधून तीन हजार रुपये वाटण्याचा प्रकार सुरू असल्याचे संजयकाका पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आचारसंहिता भरारी पथकाच्या निदर्शनास आणून दिले. पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. रात्री उशीरा हा प्रकार सुरू होता.
याबाबत सचिन पाटील व बाळासाहेब कदम या दोघांविरोधात आचारसंहितेचा भंग केला म्हणून कलम 173 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
(नक्की वाचा- पालघरमध्ये चाललंय काय? एका मागोमाग नेते का होत आहेत गायब?)
पोलिसांनी चौकशी करुन कारवाई करावी- रोहित पाटील
याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकाराशी आमचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. पोलिसांनी सखोल चौकशी करावी व संबंधितावर कारवाई करावी, अशी पोलिसांकडे त्यांनी मागणी केली. अशा प्रकारचे षडयंत्र होईल याची कल्पना आम्हाला होती, असे मत रोहित पाटील यांनी व्यक्त केले. तर भोळा भाबडा चेहरा घेऊन मिरवणाऱ्या उमेदवाराचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी संजय काका पाटील यांनी केली आहे.