
Uddhav Thackeray Sanjay Raut Interview: ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना' वृत्तपत्राला स्फोटक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध विषयांवर, राजकीय परिस्थितीवर परखडपणे मत व्यक्त केले. या मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालावरुन जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंड्या आहे, अशा शब्दात त्यांनी थेट टीका केली.
(नक्की वाचा : Devendra Fadnavis : आधी ऑफर, नंतर भेट, अखेर फडणवीसांना उद्धव ठाकरेंकडून काय हवंय? )
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
"शिवसेना एकच, आपली आहे तीच शिवसेना. अमित शहा व निवडणूक आयोगाने जी शिवसेना दुसऱयांच्या हातात दिली. मी याआधी बोललो आहे की, निवडणूक आयोग कदाचित आमचं निवडणूक चिन्ह दुसऱयाला देऊ शकतो किंवा गोठवू शकतो, पण ‘शिवसेना' हे नाव ते दुसऱ्याला देऊ शकत नाहीत. त्यांना तो अधिकारच नाही. कारण हे नाव माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी दिलं आहे. उद्या मी निवडणूक आयुक्ताचे नाव बदलून धोंड्या ठेवले तर चालेल का?" अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
तसेच "या धोंड्याला पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही. लोकशाही पद्धतीमध्ये आम्ही वेडंवाकडं वागलो असू तर गोष्ट वेगळी, पण संविधानानुसार आम्ही काही चूक केली नसेल तर ते आमचं चिन्हही काढू शकत नाहीत. मतांची टक्केवारी वगैरे जे काही असेल ते चिन्हापुरतं हे नाव दुसऱ्याला देऊ शकत नाहीत. पण त्या धोंड्यानं हे केलं ना. त्या धोंड्यानं ते बेकायदेशीर केलंय," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘शिवसेना' हे नाव त्याला दुसऱ्याला देता येत नाही. ते त्याच्या अधिकाराच्या बाहेरचं आहे, पण त्या धोंड्याला शेंदूर फासणारे दिल्लीत बसल्याने सध्या चालून जातंय. एक धोंड्या गेला आणि दुसरा खुर्चीवर बसलाय, पण तो निर्णय बदलायला तयार नाही. पण लोक कोणत्याही धोंड्याचं ऐकणार नाहीत. शेवटी चोरीचा माल आहे. चोरून मतं मिळवलीत आणि त्यावर मर्दुमकी गाजवत असलात तरी चोर तो चोरच.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world