मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याच्या राजकारणातील दोन वजनदार नेते. दोन्ही ठाकरे बंधुंचे पक्ष वेगवेगळे असले तरी ते एकत्र येणार अशा चर्चा कायम रंगत असतात. ठाकरे बंधुंनी एकत्र यावे, अशी प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे. अशातच आता बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर लावलेल्या निमंत्रण पत्रिकेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी मराठी लोकांची इच्छा आहे. शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते नेहमीच ठाकरे ब्रँड एकत्र यावा अशी इच्छा व्यक्त करत असतात. यासाठी आता मराठी सेनेने पुढाकार घेतला असून ठाकरे बंधु एकत्र येणार अशा आशयाचे पोस्टर्स बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर झळकलेत.
मराठी सेनेचे नेते मोहनिश राऊळ यांनी हे पोस्टर्स लावलेत. मोहनिश राऊळ यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी "बंधू मिलन" कार्यक्रमाचं आयोजन केले आहे. यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन बंधूंनी गुढीपाडव्याच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावं अशी विनंती निमंत्रण देऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना केली जाणार आहे.
(नक्की वाचा- बीडमधील पाचवा संतापजनक Video; आता तर क्रौर्याची हद्दच गाठली!)
बंधुमिलन पत्रिकेत काय?
भाऊ माझा आधार, माझ्या ध्येयाचा किनारा आयुष्याच्या प्रत्येक सुखदुःखाचा सोबती, भाऊ माझ्या जीवनाचा आधार. बंधू मिलन कार्यक्रम दिनांक 30 मार्च 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान मुंबई येथे सकाळी 11 वाजता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाजवळ घेण्याचे योजिले आहे. मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, तरी आपली उपस्थिती वंदनीय असेल, असं या पत्रिकेमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, ठाकरे ब्रँड एकत्रितपणे लोकांसमोर यावा. दोघांनी एकत्र येऊन येणाऱ्या महापालिका निवडणूका एकत्रित लढवाव्यात. जेणेकरुन महाराष्ट्रात सन्मानाने जगता येईल. यासाठीच हा कार्यक्रम ठेवला असून त्यादिवशी दोन्ही ठाकरेंना निमंत्रण दिले जाईल, असे मोहनिश राऊळ यांनी म्हटले आहे.