कपिल श्यामकुवर, यवतमाळ: राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. विधानसभा निवडणुकांच्या मतदानाची तारीख जवळ आली असून प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. आज यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे आज उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार संजय दरेकर यांच्या प्रचारार्थ शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेआधी सुरक्षा रक्षकांनी उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी केली. यावरुनच त्यांनी सभेमध्ये बोलताना महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. जशा माझ्या बॅगा तपासता तशाच पंतप्रधान मोदींच्या, शिंदे अजित पवारांच्या बॅगांची तपासणी करता का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'मी हॅलिकॉप्टरने आलो. आल्यावर 8-10 जण माझ्या स्वागताला होते. म्हणाले तुमची बॅग तपासायची आहे. म्हणलं तपासा. यंत्रणेला मी सांगतोय की मी काही रागावलेलो नाही. तुम्ही तुमचे कर्तव्य करता. मी माझं कर्तव्य करतोय. आम्ही त्याला विचारलं जशी माझी बॅग तपासली तशी मोदी-शहांची बॅग तपासणी करता का रे? दाढीवाल्याची बॅग तपासायला हवी की नको? गुलाबी जॅकेट वाल्याची बॅग तपासून दाखवा. पंतप्रधान असो अमित शहा असो शिंदे असो देवेंद्र फडणवीस असो किंवा अजित पवार असो, जर निवडणूक अधिकारी बॅग तपासणार नसतील तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तपासतील आणि तिथे मात्र पोलिसांनी मध्ये यायचं नाही. निवडणूक आयोगाने मध्ये यायचं नाही. आमच्या बॅगा तपासण्याचा अधिकार जसा तुम्हाला आहे तसा प्रचाराला जो कोणी येईल त्याची बॅग तपासण्याचा अधिकार हा मतदाराला आहेच.. असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.
मोदी- शहांवर निशाणा..
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी, अमित शहांवरही जोरदार निशाणा साधला. 'संविधान बदलायचा तुमचा मनसुबा आहे, तो याच्यासाठी म्हणतो किती सभा घेतात? रोज म्हणजे हल्ली रोज महाराष्ट्र मध्ये येत आहेत. मोदी पण येत आहेत, अमित शहा पण येत आहेत. बरं आलं तर वेगळं काहीतरी बोला. वेगळं काहीच नाहीये. हिम्मत असेल तर यांच्यावर बोला हिम्मत असेल तर त्यांच्यावर बोला म्हणता. अहो मी तुमच्यावर बोलतोय आणखीन काय हिम्मत दाखवायची.. असा सवालही यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच मला सभांमधून जास्त बोलण्याची गरज नाही. जाईल तिथे लोक स्वतः इथली जागा तुम्हाला दिली असं सांगत आहेत. त्यामुळे शिवसेनेचा विजय निश्चित आहे,' असा दावाही त्यांनी यावेळी केला.
धुरळा विधानसभेचा: मी संधीसाधू तर शरद पवार कोण? अशोक चव्हाणांचा पलटवार