मनोज सातवी, पालघर
पालघर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेकांचं मोठं नुकसान झालं होतं. जव्हार तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील राजेवाडी गावातील देवराम लक्ष्मण वळवी (वय 45 वर्ष) यांचं संपूर्ण घर जमीनदोस्त झालं होतं. आता जगायचे कसे या विवंचनेतून नैराश्य आल्याने देवराम वळवी यांनी 18 मे रोजी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत घर कोसळलेल्या या कुटुंबाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे देवराम वळवी यांची केवळ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लोकसभा निवडणुकीआधी पालघर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जव्हार, मोखाडा, डहाणू तालुक्यात घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक डहाणू तालुक्यात 526 घरांचे नुकसान झाले होते. तर जव्हार 454, मोखाडा 230, विक्रमगड 216, तलासरी 137, पालघर 87, वाडा 22 अशा एकूण 1672 घरांचे नुकसान झाले. जव्हारच्या नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील राजेवाडी गावाला वादळी वारा आणि पावसचा जबरदस्त तडाखा बसला.
(नक्की वाचा- वाचा - चहा पिण्याची तलफ अन् लाखोंचा गंडा; तात्यासाहेबांचं 'ते' स्वप्नही भंगलं! )
यामध्ये देवराम लक्ष्मण वळवी या आदिवासी बांधवाने मागील वर्षी घरकुल योजनेतून बांधलेलं घर जमीनदोस्त झाले. त्यात घरातील सर्व धान्य, सामान आणि जीवनावश्यक वस्तू विटांच्या ढिगार्याखाली सापडून होत्याचं नव्हतं झालं. त्यामुळे आता जगायचे कसे? आणि पुन्हा घर कसे बांधणार? या विवंचनेतून आलेल्या नैराश्यामुळे देवराम वळवी यांनी बाजूला असलेल्या त्याच्या वडिलांच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
(नक्की वाचा- मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 30 मेपासून पाणी कपात, मनपाने केले हे आवाहन)
मात्र लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत देवराम वळवी यांची केवळ अकस्मात मृत्यूची नोंद शासन दरबारी झाली. पाऊस आणि वादळी वारा थांबल्यानंतर सलग दोन दिवस देवराम हे जमीनदोस्त झालेल्या घराचे अवशेष एकत्र करत होते. सरकारकडून नुकसान भरपाई मिळेल या आशेने तालुक्याच्या ठिकाणी फेऱ्या मारल्या. परंतु आवश्यक कागदपत्रे जवळ नसल्याने नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता धूसर झाल्याने ते निराश झाले. गेल्या वर्षी बांधलेले घर जमीनदोस्त झाले, आता पुन्हा घर कसे बांधायचे? पैसे कुठून आणायचे? आणि जगायचे कसे अशी मानसिक अवस्था देवराम यांची झाली. यातूनच त्यांना हा टोकाचा निर्णय घेतला.
एका बाजूला घाटकोपर होर्डिंग आणि डोंबिवली रासायनिक कंपनीमधील स्फोटात झालेल्या मृत्यू प्रकरणाची दखल घेतली जाते, परंतु ग्रामीण भागातील आदिवासींना वाऱ्यावर सोडले जात आहे. शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव का? असा सवाल पालघर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रफुल्ल पाटील उपस्थित केला आहे. तर प्रशासनाने देवराम वळवी यांच्या आत्महत्येची संवेदशीलपणे चौकशी करून, पीडित कुटुंबाला योग्य ती मदत करून न्याय द्यावी, अशी मागणी देखील केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world