राज्याच्या विविध भागात आज देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. अकोला, अमरावती, वर्धा, नांदेड, लातूर जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. अनेक भागात पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. तर काही ठिकाणी फळबागांचंही नुकसान झालं आहे.
नांदेड शहरासह अनेक तालुक्यात सोसाट्याच्या वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. नांदेड शहरासह अनेक तालुक्यात सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमरावतीत नागरिकांना उकाड्यापासून दिलासा
अमरावतीमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लागली आहे. गेल्या काही दिवसात जिल्ह्याचे तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं. मात्र आज अमरावती जिल्ह्यात सर्वत्र विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
(नक्की वाचा- शेतीसाठी सोनं गहाण ठेवलं, पिक घेतलं, हाती पडले केवळ 557 रुपये!)
लातूरमध्ये शेती आणि फळबागांचं मोठं नुकसान
वर्ध्यात देखील प्रचंड विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाने हजेरी लावली. लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे विद्युत तारा तुटून पडल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. त्यामुळे परिसरातील विद्युत प्रवाह देखील बंद करण्यात आला आहे. शेतीच्या पिकांचं आणि फळबागांचंही मोठं नुकसान झालं आहे.
(नक्की वाचा - 1 जूनपासून पशुधनासही आधारकार्ड; अन्यथा सुविधांपासून राहावं लागेल वंचित)
वाशिममधील मालेगाव, मानोरा भागात पाऊस
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव व मानोरा तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. संध्याकाळच्या सुमारास सुरु झालेला पाऊस बराच वेळ सुरु होता. मागील 3 ते 4 दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात अधूनमधून पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसामुळे उकड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे.