'राग काढू नका, भावनिक होऊ नका...', अजित पवारांची बारामतीकरांना साद, सांगता सभेत काय म्हणाले?

बारामतीत दादागिरी गुंडगिरी चालू द्यायची नाही. कुणाचा लाड करायचा नाही. गाफील राहू नका, असे म्हणत प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी युगेंद्र पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. 

जाहिरात
Read Time: 2 mins

देवा राखुंडे,  बारामती: राज्यात विधानसभा निवडणुकांचा प्रचार आज संपणार आहे. विधानसभेच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये सांगता सभा घेतली. यावेळी अजित पवार यांनी भावनिक  होऊ नका. आपल्याला बारामतीमध्ये काम करायचे आहे. बारामतीत दादागिरी गुंडगिरी चालू द्यायची नाही. कुणाचा लाड करायचा नाही. गाफील राहू नका, असे म्हणत प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी युगेंद्र पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. 

काय म्हणाले अजित पवार? 

'नेहमीच्याच मैदानावर आज आपण आपली सांगता सभा घेतोय. आजचा दिवस खरतर माझ्या आयुष्यातला महत्वाचा दिवस आहे. बारामती विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी उभा आहे. तुम्ही मला सात वेळा आमदार आणि एक वेळा खासदार केले. आता आठव्यांदा मी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी मी उभा आहे. आता इथे माझ्या सहकाऱ्यांची थोडी गैरसोय झाली. त्यांना बसायला जागा नाही. ज्यांनी नियोजन केले त्यांचा अंदाज चुकलेला आहे. आपले नाते किती जवळचे आहे,' असं अजित पवार म्हणाले.

नक्की वाचा: महाराष्ट्राची मानसिकता तयार, 23 तारखेला कुणाचे सरकार? शेवटच्या सभेत देवेंद्र फडणवीस थेट बोलले!

'आजपर्यंत गेल्या ३५ वर्ष तुम्ही बारामतीकरांनी मला आशीर्वाद दिले. आत्तापर्यंत फक्त लोकसभेच्याच निवडणुकीत मी टेन्शनमध्ये होतो. त्यावेळी एकास एक लढत होणार होती. त्याहीवेळेस मला बारामतीकरांनी 50 हजारांचे लीड दिले. तेव्हापासून मला वाटते. आपण बारामतीकरांच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही. बारामतीमध्ये एकही घटक राहता कामा नये की मी लोकप्रतिनिधी म्हणून कमी पडेन. सगळ्यांना बारामती तालुका हवाहवासा वाटला पाहिजे. सुरक्षित वाटले पाहिजे. अशी भावना मनात  निर्माण झाली पाहीजे हेच डोळ्यासमोर ठेऊन मी काम करत राहिलो.'

'काल जे टेक्सटाईल पार्कमध्ये घडलं त्यामुळे मलाही वेदना झाल्या. मी विरोधक आले तरी त्यांचे काम करतो. काकींचं तर प्रश्नच नाही. घरात कुणी माझ्या विरोधात राहिलं तरी त्यांनाही लोकशाहीचा अधिकार आहे. पण इतक्या खालच्या पातळीला जाऊ नका. सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करु नका.बारामतीची जनता सुज्ञ आहे. मी एवढे सांगितले, काम केले. मी इतके सांगूनही बारामतीकरांनी लोकसभेला झटका दिला. जोर का झटका धीरे से लगा. तुम्ही ठरवले आहे लोकसभेला सुप्रिया ताई विधानसभेला दादा. आता तसे करा. भावनिक अजिबात होऊ नका. आपल्याला बारामतीमध्ये काम करायचे आहे. बारामतीत दादागिरी गुंडगिरी चालू द्यायची नाही. कुणाचा लाड करायचा नाही. गाफील राहू नका, असे अजित पवार म्हणाले. 

महत्वाची बातमी: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! सरकारकडून सोयाबीन-कापसाचे वाढीव हमीभाव जाहीर