संजय तिवारी, नागपूर: विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये ऑल इज नॉट वेल असल्याचं दिसत आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आगामी निवडणुका वेगळ्या लढण्याच्या तयारीत आहेत. अशातच आता मविआचा विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि त्याआधी झालेल्या जागा वाटपांच्या बैठकांवरुन काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक आरोप केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
'विधानसभा निवडणूकीत जागावाटपाची चर्चा २० दिवस चालली, यात काही षडयंत्र होतं का? असे सर्वात मोठे विधान विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. नाना पटोले, संजय राऊत हे चर्चा करत होते. आम्हीही होतो, जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत संपला असता तर १८ दिवस आम्हाला प्रचारासाठी मिळाले असते.. असंही ते म्हणालेत.
'जागावाटपात इतका वेळ वाया घालवला, यामध्ये काही प्लानिंग होतं का? बैठक ११ वाजता असायची आणि यायचे दोन वाजता. अनेक नेते उशीरा यायचे. २० दिवस हा जागा वाटपाचा घोळ चाचला. त्यामुळे फटका बसला. २० दिवस जागावाटपात वेळ घालवण्यात काही षडयंत्र होतं का? यात वाव आहे..' अशी शंका विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या विधानावरुनही महाविकास आघाडीमध्ये जोरदार जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील परिस्थिती पाहिली तर ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही. काँग्रेसची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही. आपल्याकडे लढणारे शरद पवार आहेत. सध्या विरोधी पक्षात मोठी जागा शिल्लक आहे, त्यामुळे बचेंगे तो और भी लढेंगे, असं ते म्हणाले होते.
नक्की वाचा : जीडीपी घसरण्याचा केंद्र सरकारने वर्तवला अंदाज, सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल ?
यावरुनही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अमोल कोल्हेंना प्रत्यूत्तर दिले आहे. अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला थोडा कमी द्यावा अशी टीका त्यांनी केली आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मविआमध्ये अद्यापही आलबेल नसल्याचे दिसत आहे.