दिवाळीचा सण जवळ आला आहे. दिवाळीमध्ये कष्टकरी जनता 'दिवाळी' मागते. उदा.इमारतीमध्ये सफाईकाम करणारे, वॉचमन यांचाही सण गोड व्हावा यासाठी सोसायटीतील सगळी बिऱ्हाडं त्यांच्या परीने जी रक्कम शक्य असेल ती देतात आणि ही रक्कम एकत्रितपणे कष्टकऱ्यांना दिली जाते. काही ठिकाणी कष्टकरी घरोघरी जाऊ दिवाळी मागतात आणि त्यांना ती दिली जाते. मात्र सरकारी कर्मचारीही 'दिवाळी' मागू लागल्याचा अजब प्रकार घडलाय. केमिस्टच्या दुकानात जाऊन दोघेजण 'चायपानी' मागत असल्याचा व्हिडीओ दुकान मालकाने रेकॉर्ड केला आहे. पैसे कसले मागताय असे विचारले असता या दोघांपैकी एकाने दिलेले उत्तर हे धक्कादायक होते.
नक्की वाचा: बदला तो फिक्स, आता फक्त बॉड्या मोजा! आंदेकर गँगच्या भाईंचा माज, मग पोलीसांचा दणका
अन्न आणि औषध विभागाचे अधिकारी असल्याचं संशय
सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की,"या दोन “अधिकाऱ्यांचा ?” एक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरतोय , FDA चं नाव सांगून ते दिवाळीची वर्गणी गोळा करतायत!
अनेक औषध विक्रेत्यांनी वर्गणी दिलीही आहे, काहींनी तर स्टॅम्प मारून त्यावर ₹500 असं लिहिलेलंही दिसतंय!
पगार कितीही वाढले तरी भिक्षा मागायची सवय जात नाहीच!
या प्रकारावर कारवाई कोण करणार?
की या “भिक्षेचा” हिस्सा वरपर्यंत पोहोचतोय म्हणून सगळे गप्प?"
ज्या दुकानमालकाने व्हिडीओ रेकॉर्ड केला, त्याने पैसे कशासाठी मागताय असा प्रश्न विचारला असता, पैसे मागायला आलेल्यांपैकी एकाने म्हटले की, "कोणी चांगले काम केले की आपण म्हणतो ना... हे घे ठेव पैसे चायपानी म्हणून." यावर दुकानमालकाने प्रश्न विचारला की, '500 रुपयांचा चहा ? 500 रुपयात जेवण येतं.' आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे हे दोघेजण स्टँपही मारून देत होते, हा स्टँप नेमका कसला आहे ? हे दोघे कोण आहेत? हे दोघे सरकारी कर्मचारी आहेत का ? असा प्रश्न या व्हिडीओनंतर उपस्थित झाला आहे.
नक्की वाचा: निलेश घायवाळचा वसुली पॅटर्न! ही ट्रिक वापरून कमावली एवढी संपत्ती