राज्यभरातील अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांच्या कुपोषण मुक्तीसाठी प्रशासनाकडून पुरवल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जावर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. "9 ते 10 शिट्या काढूनही न शिजणारा पांढरा वाटाणा आणि शिजवूनही कच्चा राहणारा भरडा आम्ही लहान मुलांना कसा खाऊ घालायचा?" असा उद्विग्न सवाल अंगणवाडी एका अंगणवाडी सेविकेने उपस्थित केला आहे.
अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांना या निकृष्ट अन्नावर तात्काळ बंदी घालण्याचे आवाहन केले आहे.
"10 शिट्या घेऊनही वाटाणा शिजेना"
देवयानी पारधी यांनी व्हिडिओद्वारे प्रशासनाकडून अंगणवाड्यांना पुरवल्या जाणाऱ्या कच्च्या मालाची पोलखोल केली आहे. अंगणवाड्यांमध्ये भरडा, साखर, पांढरे वाटाणे, मूगडाळ, तांदूळ, हळद आणि खाद्यतेल यांसारख्या वस्तू पुरवल्या जातात. देवयानी पारधी यांनी म्हटलं की, "प्रशासनाकडून येणारा पांढरा वाटाणा असा आहे की तो अजिबात शिजत नाही. एक दिवस आधी पाण्यात भिजत ठेवूनही आणि कुकरमध्ये 9 ते 10 शिट्या घेऊनही तो कडक आणि कच्चाच राहतो. असा न शिजलेला वाटाणा लहान चिमुकल्यांना कसा द्यायचा? आम्हाला वाईट वाटतं पण आमचा नाईलाज असतो."
(नक्की वाचा- Virar News: चिमुकलीवरून सासरे आणि सुनेमध्ये जोरदार वाद; रागाच्या भरात पुढे भयंकर घडलं)
"लापशीत साखरेचे प्रमाण अपुरे"
मुलांना दिल्या जाणाऱ्या लापशीच्या दर्जावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लापशी बनवण्यासाठी मिळणारा भरडा कितीही शिजवला तरी शेवटी कच्चाच राहतो. याशिवाय प्रशासनाकडून 1 किलो भरड्यामागे अवघी पाव किलो साखर दिली जाते. यामुळे लापशीला अजिबात गोडवा येत नाही. लहान मुले अत्यंत आशेने आणि आनंदाने अंगणवाडीत खाऊ मिळेल म्हणून येतात, परंतु आहाराला चव नसेल तर मुलांचा हिरमोड होतो, असं देवयानी पारधी यांनी म्हटलं.
"आम्ही या लहान मुलांना स्वतःच्या लेकरांसारखे जपतो. परंतु या निकृष्ट आहारामुळे मुलांचे वजन वाढण्याऐवजी ते कमी होत आहे. मग या आहाराचा काय फायदा?" असा सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला आहे.
(नक्की वाचा- Yavatmal News: डोळ्यासमोर बायकोसह 2 मुली वाहून गेल्या; झाडामुळे चालक वाचला; यवतमाळमध्ये पुराचा हैदोस!)
तुकाराम मुंडेंना आवाहन
अंगणवाडी सेविकेने हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचे आवाहन करत एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे थेट दाद मागितली आहे. "अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे साहेब, तुम्ही या निकृष्ट दर्जाच्या आहारावर त्वरित बंदी आणा. हा निकृष्ट आहार आमच्या मुलांना अजिबात नको आहे," अशी मागणी त्यांनी केली आहे. हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करुन तुकाराम मुंढे साहेबांपर्यंत पोहोचवा, असं आवाहन देखील देवयानी यांनी केलं आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.