संकेत कुलकर्णी, पंढरपूर
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे आज (3 डिसेंबर) बॅलेट पेपरवर पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया पार पडत आहे. विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालामध्ये ईव्हीएमबाबत शंका घेत मारकडवाडी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. याबाबत त्यांनी प्रशासनाकडे बॅलेट पेपरवर चाचणी मतदानाची मागणी केली होती. मात्र ही मागणी प्रशासनाने फेटाळली. यानंतर मारकडवाडी गावात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. अशातच आमदार उत्तम जानकर आणि मारकडवाडी ग्रामस्थ मतदान प्रक्रियेवर ठाम आहेत.
काय आहे मारकडवाडीचे प्रकरण?
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मारकडवाडी गावातून भाजप उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाले. हे गाव परंपरागत उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांना मानणारे आहे. जानकर आणि मोहिते पाटील एकत्र असल्याने या गावातून जानकर यांना मताधिक्य मिळणे अपेक्षित होते. असा गावकऱ्यांचा कयास आहे. मात्र भाजप उमेदवाराला मताधिक्य मिळाल्याने ईव्हीएमबाबत शंका घेऊन मारकडवाडी गावाने बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तम जानकर आमदार झाले तरीही बॅलेट पेपरसाठी आग्रह
माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून 13 हजार मताने निवडून आले. मात्र उत्तम जानकर यांना अपेक्षेप्रमाणे मताधिक्य मिळाले नाही. राम सातपुते यांनी कडवी झुंज दिली. यानंतर आता जानकर समर्थकांनी मोहिते पाटलांची ताकद असताना मताधिक्य न मिळाल्याने बॅलेट पेपरवरील मतदानाचा निर्णय घेतला. जानकर आमदार झाले तरीही लोकशाहीसाठी ही प्रक्रिया आम्ही राबवत असल्याचे आता जानकर समर्थक सांगतात.
मारकडवाडीत बॅलेट पेपरवर मतदान का?
मारकडवाडीतून राम सातपुते यांना 843 तर उत्तम जानकरांना 1003 मतं मिळाली. गावकऱ्यांच्या दाव्यानुसार सातपुतेंना अपेक्षेपेक्षा जास्त मिळाली आहेत. सातपुतेंना फक्त 100 ते 150 मते अपेक्षित होती. तर जानकरांना दीड हजार पेक्षा जास्त मतं अपेक्षित होती. हे सगळं ईव्हीएममध्ये घोळ करुन केल्याचा गावकऱ्यांना संशय आहे. त्यामुळेच बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आणि तशी प्रक्रिया आज पार पडत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world